सिटी हब मिडिया वणी…
वणी–नांदेपेरा मार्गावरील वांजरी गावाजवळ मंगळवारी ६ जानेवारीला सायंकाळी सुमारे ६.१५ वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला. तीन चाकी ऑटोला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने सात ते आठ प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, मजरा गावातील काही विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच गावकरी तीन चाकी ऑटोने गावाकडे जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रक क्रमांक MH-34 CQ-956 ने ऑटोला जबर धडक दिली. या धडकेत ऑटोचा अक्षरशः चेंदामेंदा झाला, तर ऑटोतील प्रवासी गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. मात्र, परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीस धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी असलेल्या दोघांना चंद्रपूर येथे, तर इतर जखमींना वणी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रकला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, काही काळासाठी या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली.

























