सिटी हब मिडिया वणी…
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता प्रभास यांचा बहुप्रतीक्षित नवा चित्रपट ‘राजा साहब’ अखेर प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, हा चित्रपट संक्रांतीनिमित्त शुक्रवार, दिनांक ९ जानेवारी २०२६ पासून वणी येथील दीप्ती स्काय सिनेक्स मध्ये हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. प्रभासच्या चाहत्यांसह चित्रपटप्रेमींमध्ये या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.
‘राजा साहब’ या चित्रपटात प्रभास, संजय दत्त, निधी अग्रवाल, मालविका मोहनन आणि बोमन ईरानी हे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन मारुती यांनी केले असून, या चित्रपटाची निर्मिती पीपल मीडिया फॅक्टरी आणि आयव्ही एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहेयांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे.
हा चित्रपट ऍक्शन, कॉमेडी, फँटसी, हॉरर, रोमान्स आणि थ्रिलर अशा विविध शैलींचा अनोखा संगम आहे. चित्रपटाचे कथानक एका तरुणाभोवती फिरते, जो आपल्या हरवलेल्या आजोबांचा शोध घेत असताना एका रहस्यमय आणि भुताटकी हवेलीत अडकतो. या प्रवासात तो आपल्या राजेशाही वारशाचा आणि बंडखोर वृत्तीचा स्वीकार करत सत्तेपर्यंत पोहोचतो, अशी रंजक आणि थरारक कथा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यामध्ये प्रभासचा दमदार आणि वेगळ्या लूकमधील अवतार प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे ट्रेलरमध्ये प्रभास आणि संजय दत्त यांच्यातील जबरदस्त सामना दाखवण्यात आला असून, यामुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
एकूणच, ‘राजा साहब’ हा प्रभासच्या कारकिर्दीतील वेगळ्या धाटणीचा, भव्य आणि मनोरंजनाने परिपूर्ण चित्रपट ठरण्याची चिन्हे आहेत, आणि संक्रांतीच्या सणानिमित्त वणीतील चित्रपट रसिकांना दीप्ती स्काय सिनेक्स मध्ये मोठ्या पडद्यावर हा अनुभव घेता येणार आहे.

























