सिटी हब मिडिया वणी…
**जमीन ग्रामस्थांची, संपत्ती देशाची… पण मरणयातना स्थानिकांच्या वाट्याला का?
WCL प्रशासनाचा नालायकीपणा उघड; पिंपळगाव–बोरगाव–जुनाड ग्रामस्थांचा चेअरमनच्या ताफ्याला बेलोरा–घुग्गुस पुलाजवळ घेराव**
“जमीन ग्रामस्थांची, संपत्ती देशाच्या उन्नतीसाठी, उत्पन्न देशाचे; मात्र मरणयातना स्थानिक ग्रामस्थांच्या पदरी का?” असा थेट सवाल उपस्थित करत पिंपळगाव, बोरगाव व जुनाड येथील ग्रामस्थांनी WCL प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.
कोळसा खाण प्रकल्पामुळे या तिन्ही गावांतील सुमारे ९० टक्के जमीन अधिग्रहित करण्यात आली असून, उर्वरित जमिनीवर, जंगल वाढ, जंगली प्राण्यांचा वावर, शेती उद्ध्वस्त होणे, धुळ प्रदुषण , आजारपण आणि पावसाळ्यात जलसमाधीची भीती अशा गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र WCL चे स्थानिक अधिकारी या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करित केवळ कोळसा उत्खनन करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.कोल इंडिया चे चेअरमन उकणी खाणीचे निरीक्षण दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थ सकाळपासून पिंपळगाव फाट्यावर निवेदन देण्यासाठी वाट पाहत उभे होते. मात्र WCL च्या स्थानिक अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना कोणतीही कल्पना न देता चेअरमन यांना उकणी खाणीत रस्ता बदलुन नेले तसेच लागूनच असलेल्या निलजई खाणीत जाण्यासाठी उकणी, लालगुडा, चारगाव चौकी,बेलोरा चेकपोस्ट मार्गे ५०० मिटर ऐवजी ४० किलोमीटर फिरवून नेल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
पुढे बेलोरा–घुग्गुस पुलाजवळ त्यांचा ताफा पोहोचताच, हे लक्षात येताच ग्रामस्थ संतप्त झाले.
सरपंच दिपक मत्ते यांच्या नेतृत्वात ताफा अडवून निवेदन…
सरपंच दिपक मत्ते यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी कित्येक किलोमीटरचे अंतर पार करत बेलोरा–घुग्गुस पुलाजवळ चेअरमन साहेबांचा ताफा अडविला आणि थेट निवेदन सादर केले.
यावेळी सरपंच दिपक मत्ते यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत स्पष्ट शब्दांत सांगितले की,
“WCL चे स्थानिक अधिकारी ग्रामस्थांच्या समस्या वरिष्ठ पातळीवर मांडू देत नाहीत. कोळसा वाहतुकीमुळे शेती उद्ध्वस्त होत आहे, जंगली प्राण्यांचा त्रास वाढला आहे, झुडपे व जंगल साफ केले जात नाही, गावांसभोवताल ओबीचे ढिगारे टाकले जात आहेत. पावसाळ्यात जलसमाधीची परिस्थिती निर्माण होते.”
कारवाईची मागणी; आंदोलनाचा इशारा
ग्रामस्थांनी चेअरमनकडे मुजोर व नालायक स्थानिक WCL अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई, तसेच ग्रामस्थांच्या सर्व समस्या त्वरित सोडविण्याची ठाम मागणी केली. या निवेदनाची प्रत यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे.
सरपंच दिपक मत्ते यांनी स्पष्ट इशारा दिला की,
“संपत्ती देशाची आहे, हे आम्हाला मान्य आहे. पण मरणयातना मात्र ग्रामस्थांच्या वाट्याला का? जर WCL प्रशासनाने आमच्या मागण्यांची तात्काळ दखल घेतली नाही, तर पिंपळगाव, बोरगाव व जुनाडचे ग्रामस्थ मोठ्या आंदोलनाच्या तयारीत उतरतील.”
या घटनेमुळे WCL प्रशासनाची कार्यपद्धती पुन्हा एकदा चर्चेत आली असून, आता वरिष्ठ स्तरावरून काय निर्णय घेतला जातो, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

























