सिटी हब मिडिया वणी
अवैध कोंबडा जुगारावर वणी पोलिसांनी १८ जानेवारीला मोठी कारवाई करत कुंभारखनी क्वार्टर परिसरातील जंगलसदृश भागात सुरू असलेला जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ६ जणांना अटक केली असून तब्बल ₹ १ लाख ४ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी पोलीस हवालदार निलकमल भोसले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कुंभारखनी क्वार्टरच्या मागील बाजूस काही इसम कोंबड्यांच्या झुंजीवर पैशांची बाजी लावून जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक सुयोग महापुरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पंचांसह घटनास्थळी छापा टाकला. छाप्यादरम्यान जुगार खेळताना रंगेहाथ पकडलेल्या ६ आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
अटक आरोपींची नावे:
कैलास जगन पेंदोर (३०, रा. सुरला),
धर्मा किसन परचाके (४३, रा. सुरला),
उत्तम बोडकाजी ठाकरे (५५, रा. वेगाव),
ऋषभ गजानन खुसपुरे (२८, रा. कोलगाव),
शंकर शामराव वराटे (३२, रा. मारेगाव),
रमेश हिरामन झाडे (४०, रा. गणेशपूर).
जप्त मुद्देमाल:
पोलिसांनी आरोपींकडून ₹ ४०,६०० रोख रक्कम, ३ जुगारी कोंबडे (त्यापैकी एक जखमी), ४ मोबाईल फोन, बजाज सिटी १०० दुचाकी (MH-29 BJ-4850) तसेच कोंबड्यांच्या पायाला बांधलेल्या लोखंडी धारदार कात्या जप्त केल्या आहेत. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ₹ १,०४,१५० इतकी आहे.
जप्त कोंबड्यांचा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलीस ठाण्यात लिलाव करण्यात आला असून त्यातून ₹ ८०० रक्कम प्राप्त झाली आहे. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(ब) व १२(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगार अड्डे चालवणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून वणी पोलिसांनी गुन्हेगारांना कठोर इशारा दिला आहे.

























