सिटी हब मिडिया वणी…
स्वच्छ ग्राम स्पर्धेत वणी पंचायत समितीतील मुर्धोनी ग्रामपंचायतीला द्वितीय पुरस्कार…
हा पुरस्कार संपूर्ण गावाचा; पुढच्या वेळी प्रथम क्रमांक निश्चित – सरपंच प्रशांत भोज…
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा सन 2023-24 अंतर्गत वणी पंचायत समितीतील मुर्धोनी ग्रामपंचायतीला जिल्हास्तरावर द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. या यशामुळे मुर्धोनी गावात आनंदाचे वातावरण असून, ग्रामपंचायतीच्या स्वच्छता व विकासकामांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या पुरस्काराबाबत मुर्धोनी ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशांत भोज यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की, “हा पुरस्कार केवळ माझा किंवा ग्रामपंचायतीचा नसून संपूर्ण गावाचा आहे. या पुरस्काराचे खरे मानकरी समस्त मुर्धोनी ग्रामवासी आहेत. स्वच्छता व विकासासाठी गावकऱ्यांनी एकजुटीने केलेल्या प्रयत्नांचेच हे फलित आहे.”
ते पुढे म्हणाले, “विकास आणि स्वच्छतेची ही यात्रा अखंडपणे सुरूच राहणार आहे. यंदा द्वितीय क्रमांक मिळाला असला, तरी पुढील स्पर्धेत मुर्धोनी ग्रामपंचायत प्रथम क्रमांक पटकावेल,” असा विश्वासही सरपंच प्रशांत भोज यांनी व्यक्त केला.
दरम्यान, या स्पर्धेत दारव्हा पंचायत समितीतील ग्रामपंचायत पांढुर्णा हिने प्रथम क्रमांक, तर झरीजामणी पंचायत समितीतील ग्रामपंचायत वाई लिंगी हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
याशिवाय विशेष पुरस्कारांतर्गत राळेगाव पंचायत समितीतील ग्रामपंचायत आंजी हिला स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार,
कळंब पंचायत समितीतील ग्रामपंचायत प्रधानबोरी हिला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार,
तर दारव्हा पंचायत समितीतील ग्रामपंचायत सायखेडा हिला स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
निवड झालेल्या सर्व ग्रामपंचायतींचा पुरस्कार वितरण सोहळा 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8.30 वाजता पालकमंत्री, यवतमाळ जिल्हा यांच्या हस्ते पार पडणार आहे. या सन्मानामुळे ग्रामीण भागात स्वच्छतेसह विकासकामांना अधिक चालना मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

























