सिटी हब मिडिया वणी…
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात भव्य मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शुक्रवार, दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७ वाजता पार पडणार असून, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, वणी येथून स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
मा. आमदार संजयभाऊ देरकर व जिल्हा प्रमुख संजयजी निखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नव्याने निवडून आलेले नगरसेवक यांच्या सहकार्याने या मॅराथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य सु. शेंडे यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा आयोजित करण्यात येत असून, युवकांमध्ये आरोग्य, क्रीडास्पृहा व सामाजिक एकोप्याचा संदेश देण्याचा उद्देश यामागे आहे.
ही मॅराथॉन स्पर्धा तीन गटांमध्ये घेण्यात येणार आहे. यामध्ये खुला गट – पुरुष, खुला गट – महिला तसेच १६ वर्षांखालील मुले यांचा समावेश आहे. सर्व गटांतील विजेत्या स्पर्धकांना आकर्षक रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेत प्रथम क्रमांकास ₹३,०००, द्वितीय क्रमांकास ₹२,०००, तृतीय क्रमांकास ₹१,५०० तर चतुर्थ क्रमांकास ₹१,००० रोख बक्षीस देण्यात येणार आहे. याशिवाय, प्रत्येक गटातील प्रथम १० स्पर्धकांना आकर्षक मोमेंटो देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या भव्य मॅराथॉन स्पर्धेत वणी शहरातील नागरिक, युवक व क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहावी, असे आवाहन आयोजक युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य सु. शेंडे यांनी केले आहे.

























