सिटी हब मिडिया वणी…
वणी शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली. वणी येथील कब्रस्तान ईदगाहमध्ये सकाळी साडे आठ वाजता ईदची नमाज अदा करण्यात आली. यावेळी इमाम साहेबांनी देशात अमन-शांती, बंधुभाव कायम राहावा तसेच भारताच्या प्रगतीसाठी विशेष दुआ मागितली.

यावेळी वणी येथील कब्रस्तानच्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला. माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या माध्यमातून सुमारे २० लाख रुपयांची विकासकामे पूर्ण करण्यात आली असून दोन सोलर हायमास्ट टॉवर बसविण्यात आले आहेत. या कामांसाठी उपस्थितांनी त्यांचे आभार मानले.

तसेच मुकुटबन कब्रस्तानासाठी ५० लाख रुपयांची तर मारेगाव कब्रस्तानासाठी ४० लाख रुपयांची निधी उपलब्ध करून देण्यात आला असून त्या ठिकाणीही विकासकामे पूर्ण झाली आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
प्रभाग क्रमांक १३ मधून नगरसेवक सैफूर रहमान, प्रभाग क्रमांक ९ मधून नगरसेवक अब्दुल हफीज उर्फ टापू तसेच प्रभाग क्रमांक १४ मधून नगरसेवक गुलाम रसूल रंगरेज यांनी वणी कब्रस्तानात आणखी एक सोलर हायमास्ट टॉवर तसेच दहा सोलर लाईट पोल बसविण्याची मागणी केली.
कब्रस्तान स्वच्छतेसाठी विशेष आवाहन…
कब्रस्तानांच्या स्वच्छतेसाठी मुस्लिम समाजातील प्रत्येक बांधवांनी दररोज एक रुपया देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. या उपक्रमाला समाजातून मोठा प्रतिसाद मिळत असून अनेकांनी या संकल्पनेला पाठिंबा दर्शविला आहे. सामाजिक बांधिलकीतून कब्रस्तान स्वच्छ ठेवण्यासाठी आता प्रशासनासोबतच स्थानिक मुस्लिम समाजही सक्रिय सहभाग नोंदवणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
कार्यक्रमानंतर कब्रस्तान कमिटीच्या वतीने माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांचे विशेष आभार मानण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी एकमेकांना मिठी मारून ईदच्या शुभेच्छा देत सणाचा आनंद लुटला.
दरम्यान, वणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर, एसडीपीओ तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यांच्या सेवेसाठी कब्रस्तान कमिटीने त्यांचेही आभार व्यक्त केले.

























