सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देत गोरगरिबांच्या सेवेत सदैव तत्पर राहणारे वणीतील दानशूर व्यक्तिमत्त्व, शिवसेना नेते विजय चोरडिया यांचा वाढदिवस ४ सप्टेंबर रोजी साजरा होत आहे. विजय चोरडिया यांचा जन्मदिवस तिथीनुसार दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीला असतो. यंदा मात्र वाढदिवसाची तारीख आणि जन्माची तिथी एकाच दिवशी म्हणजे ४ सप्टेंबरला आल्याने हा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. त्यामुळे त्यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

वारसा समाजसेवेचा : जबाबदारीची धुरा आता कुणाल चोरडिया यांच्याकडे…
वणीतील ऐतिहासिक श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीची धुरा विजय चोरडिया यांनी अनेक वर्षे यशस्वीपणे सांभाळली. आता ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांनी सुपुत्र कुणाल चोरडिया यांच्याकडे सोपवून, स्वतः संपूर्ण वेळ समाजकारण आणि जनसेवेसाठी दिला आहे.
‘पैसा सर्वांकडेच असतो, मात्र देवाने दिलेली संपत्ती ही केवळ लोकांच्या सेवेसाठी आहे,’ या निस्वार्थ भावनेतून ते सातत्याने कार्य करत असतात. त्यांच्याकडे मदतीसाठी येणाऱ्यांची नेहमीच रीघ असते आणि प्रत्येकाचे समाधान होईल याची ते जातीने काळजी घेतात.
गावोगावी आरोग्य शिबिरे : तपासणीपासून ते शस्त्रक्रियेपर्यंतचा संपूर्ण खर्च स्वतःचा…विजय चोरडिया यांच्या कार्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी राबवले जाणारे उपक्रम. हे उपक्रम केवळ वणी शहरापुरते मर्यादित न राहता त्यांनी ग्रामीण भागात, गावोगावी आरोग्य शिबिरांचे यशस्वी आयोजन केले आहे.
या शिबिरांमध्ये नामवंत व अतिशय तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहून रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन करतात.
केवळ तपासणी करून न थांबता, रुग्णांवर होणाऱ्या शस्त्रक्रिया अथवा पुढील संपूर्ण उपचारांची जबाबदारी ते स्वतः उचलतात.
रुग्णांना स्वखर्चाने दवाखान्यात नेण्यापासून, उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांना सुखरूप घरी पोहोचवण्यापर्यंतची सर्व व्यवस्था ते स्वतःच्या खिशातून करतात.
धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात मोठे योगदान…
वणी परिसरातील प्रसिद्ध जैताई मंदिर, रंगनाथ स्वामी मंदिर, श्रीकृष्ण मंदिर असो किंवा श्यामबाबा मंदिर असो; तसेच परिसरातील विविध मठ व मंदिरांच्या धार्मिक कार्यात त्यांचे नेहमीच सढळ हाताने योगदान राहिले आहे. कोणताही मठ किंवा मंदिराचे विश्वस्त, भाविक अथवा गरजू व्यक्ती त्यांच्या दारी मदतीची मागणी घेऊन आल्यास ते कधीही रिकाम्या हाताने परत जात नाहीत.
शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत मोलाचा वाटा…
व्यवसाय, समाजकारण आणि राजकारण यांची उत्तम सांगड घालत विजय चोरडिया यांनी आपला दांडगा जनसंपर्क निर्माण केला आहे. सध्या शिवसेना पक्षात ते वणी, यवतमाळ आणि राळेगाव विधानसभा क्षेत्राचे संपर्क प्रमुख व संघटन मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या नेतृत्वावर आणि समाजभिमुख कार्यावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते सातत्याने शिवसेनेत प्रवेश करत असून, ते कार्यकर्त्यांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शनही करत असतात. सामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात धावून जाणाऱ्या या दानशूर नेतृत्वावर ४ सप्टेंबर रोजी सर्वच स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


























