सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
नागराज आर्ट अँड कल्चरल हेरिटेज फाउंडेशन (नाच फाउंडेशन), नागपूर यांच्या वतीने आयोजित ‘नृत्यध्वनि’ – ऑल इंडिया १स्ट क्लासिकल-फोक-मॉडर्न नॅशनल डान्स कॉन्टेस्ट अँड फेस्टिव्हल या राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणी येथील चिमुकल्या बहिणींनी आपल्या अप्रतिम नृत्याविष्काराने यश संपादन केले आहे. या स्पर्धेत रिया आकाश शर्मा आणि भुवी आकाश शर्मा यांनी ‘मायनर डिव्हिजन – इंडियन फोक ड्युएट’ (युगल नृत्य) गटात द्वितीय पारितोषिक (Second Merit Award) पटकावून वणी शहराचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले.

या राष्ट्रीय नृत्य महोत्सवात देशभरातून अनेक बालकलाकारांनी सहभाग नोंदवला होता. वणी येथील चौथीच्या वर्गात शिकणारी ९ वर्षीय रिया शर्मा आणि केजी-२ ची ५ वर्षीय चिमुरडी भुवी शर्मा यांनी भारतीय लोकनृत्य (Indian Folk Dance) प्रकारात अतिशय तालबद्ध, नयनरम्य व मनमोहक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्यातील अप्रतिम ताळमेळ आणि कलागुणांची दखल घेत परीक्षकांनी त्यांना द्वितीय पारितोषिकाने सन्मानित केले.

त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल विविध क्षेत्रांतून, कलाप्रेमींकडून व नातेवाईकांकडून रिया आणि भुवी यांच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. चिमुकल्या वयात मिळवलेल्या या राष्ट्रीय यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

























