सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
वणी, मारेगाव, झरी तालुक्यांतील शिवसैनिकांची अलोट गर्दी; सर्वपक्षीय दिग्गजांचीही उपस्थिती…

सत्तेच्या समीकरणांपेक्षा जनसामान्यांशी जोडलेली नाळ आणि संकटकाळात कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची धमक, या जोरावर राजकीय पटलावर स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करणारे शिवसेना यवतमाळ जिल्हाप्रमुख आशिष खुलसंगे यांच्या वाढदिवसानिमित्त शक्तिप्रदर्शनासह चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले. गावपातळीवरील प्रश्नांची जाण आणि संघटनात्मक बांधणीच्या बळावर वाटचाल करणाऱ्या या नेतृत्वावर संपूर्ण जिल्ह्यातून शुभेच्छांची बरसात झाली.
वणी उपविभागात शिवसैनिकांचा महामेळावा…
वाढदिवसाचे औचित्य साधून वणी तालुकाप्रमुख प्रसाद ठाकरे, मारेगाव तालुकाप्रमुख विशाल किन्हेकर तसेच झरी तालुकाप्रमुख बाळू चेडे यांच्या संयुक्त नियोजनातून भव्य अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. याप्रसंगी वणी, मारेगाव व झरी या तिन्ही तालुक्यांतील तरुण वर्ग, महिला आघाडी आणि जेष्ठ पदाधिकाऱ्यांनी तुफान गर्दी करत परिसर दणाणून सोडला. सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद ठेवणारा नेता म्हणून शिवसैनिकांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांच्या जयघोषात आपल्या लाडक्या नेत्याचा गौरव केला.


सरपंच ते जिल्हाप्रमुख: संघर्षातून उभा राहिलेला प्रवास…
आशिष खुलसंगे यांचा राजकीय प्रवास हा कोणत्याही आयत्या पीठावर रेघोट्या मारणारा नसून ग्रामीण जनतेच्या विश्वासातून आकारास आला आहे. ग्रामपंचायतीचे सरपंचपद, त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य म्हणून बजावलेली प्रभावी कामगिरी आणि आज थेट शिवसेना यवतमाळ जिल्हाप्रमुख पदाची धुरा, असा त्यांचा चढता आलेख राहिला आहे. ग्रामीण जनतेच्या प्रश्नांची सखोल मांडणी आणि कार्यकर्त्याला कुटुंबातील सदस्य मानण्याची वृत्ती हीच त्यांची खरी राजकीय ढाल ठरली आहे.
पक्षीय सीमा ओलांडून राजकीय दिग्गजांची मांदियाळी…या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राजकीय मतभेद बाजूला ठेवून विविध पक्षांतील ज्येष्ठ नेत्यांनी आवर्जून लावलेली उपस्थिती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार वामनराव कासावार, ज्येष्ठ विधिज्ञ तथा काँग्रेस नेते ॲड. देविदास काळे, तसेच मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन खुलसंगे यांना भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक सदिच्छा दिल्या. विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमुळे खुलसंगे यांचा सर्वदूर असलेला जनसंपर्क आणि मैत्रीचे संबंध अधोरेखित झाले.
कार्यकर्ता हेच शक्तिस्थान…पदाची झूल बाजूला ठेवून प्रत्येक कार्यकर्त्याच्या अडीअडचणीत धावून जाण्याची कार्यशैली हे आशिष खुलसंगे यांचे बलस्थान आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर तिन्ही तालुक्यांतील कार्यकर्त्यांनी दाखवलेली ही वज्रमूठ आणि सर्वपक्षीय नेत्यांशी असलेला सलोखा, यामुळे यवतमाळ जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खुलसंगे यांच्या वाढत्या प्रभावाची आणि नेतृत्वाची जोरदार चर्चा रंगली आहे. दिवसभर विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रांतील मान्यवरांच्या शुभेच्छांचा ओघ अविरत सुरू होता.

























