सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
मनसेच्या आक्रमक पवित्र्यापुढे प्रशासन झुकले; नांदेपेरा-शेलू मार्गाच्या दुरुस्तीला अखेर मुहूर्त सापडला…
अनेक दिवसांपासून चाळण झालेल्या नांदेपेरा-शेलू आणि नांदेपेरा-रांगणा या दोन महत्त्वाच्या रस्त्यांच्या दुरवस्थेने त्रस्त झालेल्या नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शेलू येथील ग्रामस्थांना सोबत घेऊन छेडलेल्या संघर्षाला अखेर यश आले असून, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने युद्धपातळीवर रस्ता दुरुस्तीला प्रारंभ केला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे दररोज किरकोळ अपघात घडत होते. शाळकरी मुले, नोकरदार, महिला आणि रुग्णांना या रस्त्यावरून प्रवास करणे जीवावर बेतत होते. वारंवार निवेदने देऊनही बांधकाम विभागाकडून कोणतीच कार्यवाही होत नव्हती.
या प्रश्नावर ३ सप्टेंबरलाच मनसेने आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र गावातील एका दुःखद प्रसंगामुळे आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या तोंडी आश्वासनामुळे ते आंदोलन पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर एक महिना उलटूनही एकही खडी टाकली न गेल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला.
अखेर मनसे नेते राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी रस्ता रोको आंदोलन पुकारले. याबाबत पोलिस ठाणे, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाला लेखी पत्र देऊन, “उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला बांधकाम विभागच जबाबदार असेल” असा स्पष्ट इशारा देण्यात आला होता.
या इशाऱ्याचा मोठा धसका प्रशासनाने घेतला. ७ ऑक्टोबरला आंदोलन सुरू होताच जिल्हा परिषदेचे कार्यकारी उपअभियंता अनंत घोपे यांच्यासह पथकाने तातडीने घटनास्थळ गाठले. आंदोलकांशी चर्चा करून त्यांनी रस्त्याच्या तात्पुरत्या डागडुजीचे काम त्याच दिवशी सुरू केले, तसेच संपूर्ण रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याचे लेखी पत्र दिले.
प्रशासनाने लेखी आश्वासन देऊन प्रत्यक्ष काम सुरू केल्यानंतरच मनसेने आंदोलन मागे घेतले.
“प्रशासन वेळकाढूपणा करत असल्याने आम्हाला रस्त्यावर उतरावेच लागले. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मनसे नेहमीच आग्रही राहील. काम पूर्ण होईपर्यंत आम्ही लक्ष ठेवून आहोत.”– फाल्गुन गोहोकार, तालुकाध्यक्ष, मनसे, वणी
मनसेच्या या पाठपुराव्यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला प्रश्न निकाली निघणार असल्याने नांदेपेरा, शेलू आणि रांगणा येथील नागरिकांनी मनसेचे आभार मानले आहेत.

























