सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
शेतातील खरीप पिकांच्या आडून गांजाची बेकायदेशीर लागवड करणाऱ्या एका शेतकऱ्याला शिरपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मौजा कायर शिवारातील एका शेतातून तब्बल पावणेदोन लाख रुपये किमतीचा १८.५८० किलो वजनाचा हिरवा गांजा हस्तगत करण्यात आला असून, या कारवाईने अंमली पदार्थ तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. सुखदेव लेतु आत्राम (वय ५० वर्षे, रा. सैदाबाद) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई…शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ व गांजा विक्रीविरोधात विशेष शोधमोहीम राबवली जात आहे. या दरम्यान, सैदाबाद येथील सुखदेव आत्राम हा कायर शिवारातील स्वतःच्या शेतात कापूस आणि तुरीच्या पिकांमध्ये छुप्या पद्धतीने गांजाची लागवड करत असल्याची पक्की माहिती गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना मिळाली. इतकेच नव्हे, तर विक्रीसाठी काही झाडे उपटून शेतातच ठेवली असून उर्वरित झाडेही तोडण्याच्या तयारीत असल्याची खबर पोलिसांच्या हाती आली होती.
१२७ झाडे उपटली; १ लाख ८५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त…माहितीची खातरजमा होताच पोलीस पथकाने पंचांसह थेट कायर शिवारातील संशयित शेतात धाड टाकली. शेतात झाडाझडती घेतली असता, कापूस व तुरीच्या झाडांमध्ये लपवून लावलेली गांजाची १२७ झाडे आढळून आली. पोलिसांनी तातडीने ही झाडे जप्त केली असून, त्यांचे एकूण वजन १८.५८० किलोग्रॅम भरले. बाजारभावानुसार या गांजाची अंदाजे किंमत १ लाख ८५ हजार ८०० रुपये इतकी आहे. पोलिसांनी सर्व मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवणार: पोलिसांचे आवाहन…परिसरात अशा प्रकारे छुप्या पद्धतीने गांजाची शेती, विक्री किंवा इतर अंमली पदार्थांची तस्करी सुरू असल्यास नागरिकांनी तात्काळ शिरपूर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन ठाणेदारांनी केले आहे. माहिती पुरवणाऱ्या नागरिकाचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, अशी ग्वाहीही पोलिसांनी दिली आहे.
या पथकाने बजावली कामगिरी…सदर यशस्वी कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक डॉ. कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. शिरपूरचे ठाणेदार सपोनि संतोष मनवर यांच्या नेतृत्वात पोउपनि धीरज उल्हाणे, पोलीस हवालदार इकबाल शेख, सूरज साबळे, पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर दराडे, दिपक वाकडे, अनुप फुलुके, विजय फुलुके, प्रफुल नाईक तसेच होमगार्ड पथकाने ही कामगिरी केली.

























