सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
परिसरातील प्रवाशांचे हाल, रखडलेले उड्डाणपूल आणि कोळशाच्या वाढत्या धूळ प्रदूषणावर ठोस तोडगा काढण्यासाठी स्थानिक आमदार संजय देरकर यांनी नागपूर रेल्वे मंडळाचे प्रबंधक (डीआरएम) विनायक गर्ग यांच्यासोबत गुरुवारी महत्त्वपूर्ण चर्चा केली. मुकुटबन येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या आंदोलनाची दखल घेत रेल्वे प्रशासनासोबत ही तातडीची बैठक पार पडली.
५ ऑक्टोबर रोजी मुकुटबन येथे प्रवाशांनी रेल्वे थांब्यासाठी जनआंदोलन छेडले होते. या जनभावनेची गांभीर्याने दखल घेत, तिथे तातडीने रेल्वे थांबा मंजूर करून प्रक्रिया गतिमान करावी, अशी स्पष्ट भूमिका आमदार देरकर यांनी बैठकीत मांडली. यावर रेल्वे प्रशासनाकडून अनुकुलता दर्शविण्यात आली.
रखडलेले प्रकल्प आणि नागरी समस्यांवर बोट…
शहरातील वाहतुकीचा खोळंबा दूर करणाऱ्या यवतमाळ व वरोरा-चंद्रपूर मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलांच्या संथ गतीवर आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पुलांचे काम सुरक्षेचे नियम पाळून वेळेत पूर्ण करावे, तसेच नांदेपेरा रेल्वे फाटकामुळे रोज होणारी कोंडी फोडण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी सूचना त्यांनी केली. याशिवाय वणी रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी पुरेशी आसनव्यवस्था, स्वच्छ प्रसाधनगृहे आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचा अभाव असल्याकडेही प्रशासनाचे लक्ष वेधले.
कोळशाची धूळ आणि खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर…
स्थानक परिसरात वेकोलि (WCL) व खासगी साइडिंगवरून सुरू असलेल्या कोळसा वाहतुकीमुळे हवेत प्रचंड प्रमाणावर धूळ पसरत असून स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषण नियंत्रण यंत्रणा व रेल्वेने संयुक्त सर्वेक्षण करून येथे धूळ प्रतिबंधक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली. तसेच, वणी-कायर रस्त्यावरील पूल क्रमांक १८ जवळ रस्त्याची चाळण झाल्याने अपघातांची शक्यता वाढली असून तेथील खड्डे प्राधान्याने बुजवण्याची तंबी देण्यात आली.
या बैठकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख सतीश आदेवार, नेताजी पारखी, संदीप विंचू, संकेत गज्जलवार, श्रावण देशमुख, आशिफ सय्यद, निलेश चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते. जोपर्यंत या मागण्या प्रत्यक्षात पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत पाठपुरावा अखंड सुरू राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

























