सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी...
कापूस पिकाच्या आडून गांजाची लागवड करण्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. काही दिवसांपूर्वीच शिरपूर पोलिसांनी कायर शिवारात धाड टाकून १ लाख ८५ हजार रुपयांचा गांजा जप्त केला होता; ही घटना ताजी असतानाच आता स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पाटण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पार्टी शिवारात छापा टाकून तब्बल २ लाख ३६ हजार ७५० रुपयांची २९ गांजाची झाडे हस्तगत केली आहेत. याप्रकरणी संशयित आरोपी विलास नागोराव टेकाम (वय ३५, रा. पार्टी, ता. झरी जामणी) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
शिरपूर पाठोपाठ पाटण हद्दीत धडक कारवाई:
काही दिवसांपूर्वी शिरपूर हद्दीतील कायर शिवारात कापूस आणि तुरीच्या पिकात लपवून लावलेली १२७ झाडे पोलिसांनी पकडून सुखदेव आत्राम याला अटक केली होती. ही कारवाई ताजी असतानाच वणी उपविभागात गस्त घालत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मौजा शिवला गावानजीक गोपनीय माहिती मिळाली. पार्टी गावातील तलावाशेजारील शेतात विलास टेकाम याने कापसाच्या पिकात बेकायदेशीररीत्या गांजाची झाडे लावल्याचे स्पष्ट झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तातडीने सर्च वॉरंट व आवश्यक परवानग्या घेऊन एलसीबीने सापळा रचला.
कपाशीच्या झाडांमध्ये लपवली होती ४ ते ५ फूट उंच झाडे:
महसूल पंच, कृषी तज्ज्ञ व मोजणीदारांच्या उपस्थितीत संशयित शेताची पाहणी केली असता, कपाशीच्या पिकात सुमारे ४ ते ५ फूट उंचीची २९ हिरवीगार गांजाची (कॅनॅबिस) झाडे आढळून आली. या लागवडीचा कोणताही कायदेशीर परवाना आरोपीकडे नव्हता. पोलिसांनी मुळे, खोड, पाने आणि बियांसह तब्बल ७ किलो ६४५ ग्रॅम वजनाचा हा अमली साठा जागीच जप्त केला. जप्त केलेल्या या मुद्देमालाची किंमत २ लाख ३६ हजार ७५० रुपये इतकी आहे.
तस्करांचे धाबे दणाणले; पोलीस पथकाची कामगिरी:
सदर धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात व वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. एलसीबी प्रमुख पोलीस निरीक्षक सतिष चवरे, सपोनि दत्ता पेंडकर, ठाणेदार सपोनि मिलिंद सरकटे (पो.स्टे. पाटण), पोउपनि धनराज हाके यांच्यासह पोलीस अंमलदार सुनील खंडागळे, सुधीर पिदूरकर, सुधीर पांडे, किशोर आडे, रजनीकांत मडावी, सलमान शेख, नरेश राऊत आणि सतिष फके यांनी ही यशस्वी मोहीम राबवली. वणी उपविभागात लागोपाठ झालेल्या या दोन्ही मोठ्या कारवायांमुळे शेताच्या आडून अमली पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

























