सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी भाजप सज्ज; भाजपच ठरेल सर्वात मोठा पक्ष : संजीवरेड्डी यांचा विश्वास…
वणी विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते तथा माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा ६२ वा वाढदिवस साजरा होत आहे. वयाची ६१ वर्षे पूर्ण करून ६२ व्या वर्षात पदार्पण करत असताना, संपूर्ण मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये व समर्थकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. संजीवरेड्डी हे वणी परिसरातील एक सर्वसमावेशक व जनमानसावर मजबूत पकड असलेले नेते म्हणून ओळखले जातात; आजही पक्षसंघटनेवर आणि मतदारांवर त्यांची पकड तितकीच घट्ट आहे.
शेतकऱ्यांवरील दुष्काळाच्या संकटाची जाणीव ठेवून वाढदिवस साधेपणाने…
वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असला, तरी सध्या बळीराजावर ओढवलेले दुष्काळाचे सावट आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन संजीवरेड्डी यांनी आपला वाढदिवस कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी अडचणीत असताना मोठा उत्सव साजरा करणे योग्य नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
“राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर योग्य भरपाई मिळावी यासाठी आपण स्वतः सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत राहू. कोणत्याही परिस्थितीत बळीराजाचे नुकसान होऊ दिले जाणार नाही,” असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
नगरपालिकेत एकहाती सत्तेबद्दल वणीकरांचे मानले आभार…
नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत वणीकरांनी भाजपवर विश्वास दाखवत एकहाती सत्ता सोपवल्याबद्दल संजीवरेड्डी यांनी जनतेचे मनःपूर्वक आभार मानले. “जनतेने दिलेला हा कौल विकासाच्या राजकारणाला मिळालेली पावती आहे. माझ्या कार्यकाळात सुरू झालेली आणि अपूर्ण राहिलेली सर्व विकासकामे मार्गी लावणे हे माझे प्राथमिक उद्दिष्ट असेल. वणी शहराच्या विकासाला आता एक नवी दृष्टी मिळेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
पाणीपुरवठा, उड्डाणपूल आणि सांस्कृतिक भवन: विकासाला नवी गती…
वणीकरांच्या मूलभूत आणि महत्त्वाकांक्षी गरजांवर बोलताना त्यांनी विकासकामांचा आढावा मांडला:
२४ तास शुद्ध पिण्याचे पाणी: ‘अमृत’ योजनेच्या माध्यमातून वणीतील प्रत्येक नागरिकाला २४ तास शुद्ध पिण्याचे पाणी देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न असून या योजनेचे काम आता प्रत्यक्ष सुरू झाले आहे.
रेल्वे उड्डाणपूल: शहरातील वाहतुकीची कोंडी फोडणारा रेल्वे उड्डाणपूल लवकरात लवकर पूर्णत्वास आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
सांस्कृतिक भवन (ड्रीम प्रोजेक्ट): वणीकरांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी ठरलेल्या भव्य ‘सांस्कृतिक भवना’ची इमारत आता पूर्ण झाली आहे. या इमारतीचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यासाठी त्यांची तारीख घेण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात तारीख घेऊन या वास्तूचे लवकरात लवकर लोकार्पण केले जाईल, अशी पक्की ग्वाही संजीवरेड्डी यांनी यावेळी दिली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच सर्वात पुढे राहणार: पक्षबांधणी पूर्ण…
आगामी राजकीय समीकरणांवर भाष्य करताना संजीवरेड्डी यांनी सांगितले की, “येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये—मग ती जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो वा ग्रामपंचायतीच्या निवडणुका असोत—जनता विकासाच्या मुद्द्यावर भाजपलाच भरभरून मतदान करेल. या सर्व निवडणुकांमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल यात शंका नाही. आमच्या पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि निवडणुकीची तयारी पूर्ण झालेली आहे. आम्ही आता केवळ निवडणूक घोषणेची वाट पाहत आहोत; एकदा निवडणुकीची घोषणा झाली की भाजप या निवडणुकीत सर्वांच्या पुढे असेल.”
पक्षकार्य आणि जनसेवेसाठी सदैव तत्पर राहण्याचा वाढदिवशी संकल्प…
६२ व्या वर्षात पदार्पण करताना संजीवरेड्डी यांनी नव्या ऊर्जेने आणि जोमाने जनतेची सेवा करण्याचा संकल्प केला आहे. “पक्ष देईल ती प्रत्येक जबाबदारी अत्यंत इमानदारीने पार पाडेन. पक्षातील कुठल्याही कार्यकर्त्यासाठी मी नेहमी उपलब्ध असेन. वणीच्या जनतेचे हित हेच माझे अंतिम ध्येय असून, नागरिकांच्या सुख-दुःखात आणि अडीअडचणीत मी सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन,” असा पुनरुच्चार त्यांनी केला.
या वाढदिवसानिमित्त वणी शहर भाजप अध्यक्ष एड.निलेश चौधरी यांनी संजीव रेड्डी बोदकुरवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत तसेच संपूर्ण वणी विधानसभा मतदारसंघातून संजीवरेड्डी यांच्यावर विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून, राजकीय पदाधिकाऱ्यांकडून आणि नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.सिटी हब मिडिया वणी तर्फे संजीव रेड्डी बोदकुरवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

























