सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
शेतीचे काम आटोपून गावाहून घराकडे परतत असताना काळाने अचानक घाला घातला. भरधाव वेगात आलेल्या एका अनियंत्रित कारने दिलेल्या जोरदार धडकेत जनता विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक बाळासाहेब अंकुजी टोंगे (वय ६७, रा. प्रगतीनगर, वणी) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. हा भीषण अपघात रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास वणी-घुगूस रस्त्यावरील जन्नत हॉटेलनजीक घडला.
प्राप्त माहितीनुसार ,बाळासाहेब टोंगे हे रविवारी आपल्या पुरड येथील शेतात गेले होते. तिथून दुचाकीने वणी शहराकडे परत येत असताना, मागून अत्यंत वेगाने आलेल्या मारुती स्विफ्ट कारने (क्रमांक: एमएच २९ एडी ७७७१) त्यांच्या वाहनाला भीषण धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, शिक्षक टोंगे हे कारसोबत काही अंतरापर्यंत फरफटत गेले. या भीषण आघातात गंभीर दुखापती झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताचा मोठा आवाज ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या दुर्दैवी घटनेची वार्ता समजताच वणी शहर आणि प्रगतीनगर परिसरात तीव्र शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असून, पुढील कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात केली आहे.

























