सुनिल तुगनायत सिटी हब मिडिया वणी…
वणी शहरात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या गोवंश हत्या आणि तस्करीच्या प्रकाराचा पर्दाफाश बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ९० किलो गोमांस जप्त केले असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून संतप्त नागरिकांनी या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, वणी येथील इस्लामपुरा (खरबडा मोहल्ला) भागात राहणारे सलमान शकील शेख आणि नावेद शेख रियाज हे गेल्या ५ ते ७ वर्षांपासून गोवंश चोरी आणि त्यांच्या हत्येच्या व्यवसायात गुंतलेले होते. १० एप्रिल २०२६ रोजी हनुमान मंदिर व जत्रा मैदान परिसरात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने छापा टाकून त्यांच्याकडून ९० किलो गोमांस जप्त केले. या कारवाईनंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
नागरिकांच्या तक्रारीतील गंभीर आरोप…
या घटनेनंतर इस्लामपुरा भागातील संतप्त नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते इजहार शेख यांना सोबत घेऊन पोलीस ठाणेदार गोपाळ उंबरकर आणि जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे. या निवेदनात काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत:
तस्करीचे जाळे: आरोपी केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर बेला आणि आदिलाबाद (तेलंगणा) पर्यंत चोरीच्या जनावरांची तस्करी करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
निर्घृण हत्या: निर्गुडा नदीच्या पात्रातील झाडाझुडपात किंवा स्वतःच्या राहत्या घरी जनावरांची कत्तल केली जाते. हे मांस ३०० रुपये प्रति किलो दराने विकले जात होते.
शस्त्रांचा धाक: आरोपींकडे घातक शस्त्रे असून ते परिसरातील नागरिकांना धमकावत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
मोठ्या प्रमाणावर चोरी: वणी शहर आणि ग्रामीण भागातून गेल्या काही काळात १२०० ते १५०० जनावरे चोरीला गेल्याचा अंदाज नागरिकांनी वर्तवला असून, त्याचा या प्रकरणाशी संबंध असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.
‘बुलडोझर’ कारवाईची मागणी…
निवेदनाद्वारे नागरिकांनी मागणी केली आहे की, या आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात यावी. तसेच, आरोपींनी जनावरांच्या हत्येतून कमावलेल्या पैशातून बांधलेली ‘अनधिकृत बांधकामे’ बुलडोझर चालवून जमीनदोस्त करावीत, अशी आक्रमक मागणीही नागरिकांनी केली आहे.

या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे, पोलीस अधीक्षक (यवतमाळ) आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत. सध्या वणी पोलीस फरार आरोपींचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.वणी पोलिसांनी सुद्धा या प्रकरणी आरोपींवर कठोरपणे कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे…

























