सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
वणीत १३ ऑगस्टला भव्य तिरंगा रॅली; देशभक्तीचा जागर होणार…

नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना दृढ व्हावी, राष्ट्रीय एकात्मतेचा आणि देशप्रेमाचा संदेश घराघरात पोहोचावा या उद्देशाने समस्त देशभक्त नागरिकांच्या वतीने वणी शहरात गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता भव्य “तिरंगा रॅली”चे आयोजन करण्यात आले आहे.
या रॅलीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या रॅलीत कोणत्याही राजकीय पक्षाचे बॅनर, झेंडे किंवा घोषणा असणार नाहीत. केवळ वणीकर नागरिक म्हणून हातात तिरंगा घेऊन देशप्रेम व्यक्त करण्यात येणार आहे.
या तिरंगा रॅलीमध्ये वणी शहरातील विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, विविध धार्मिक व सांस्कृतिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. ही पूर्णपणे पद-रॅली असणार असून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक समस्त देशभक्त नागरिकांच्या वतीने करण्यात आले आहे.
रॅलीचा तपशील :
दिनांक – गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६
वेळ – सकाळी ९.०० वाजता
प्रारंभ स्थळ – विश्रामगृह, वणी
रॅलीचा मार्ग :
विश्रामगृह येथून प्रारंभ होऊन छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, खाती चौक, महात्मा गांधी चौक, संत गाडगेबाबा चौक, वीर भगतसिंग चौक, सर्वोदय चौक, रविंद्रनाथ टागोर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, लो. टिळक चौक या प्रमुख मार्गांवरून रॅली मार्गक्रमण करणार आहे.
“मी येतोय, आपणही या… चला वणीत देशभक्तीचा उत्साह अनुभवूया,” असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
वणी तालुक्यातील सर्व नागरिक, युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ही तिरंगा रॅली यशस्वी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
आपले विनीत, समस्त देशभक्त नागरिक, वणी

























