सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून चोरडिया हॉस्पिटलने सामाजिक उत्तरदायित्वाची एक सुंदर परंपरा जपली आहे. जनतेच्या रक्षणासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र राबणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसह शासकीय अधिकाऱ्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी १५ ऑगस्ट रोजी विशेष मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील या अनोख्या उपक्रमाचे वणी शहरात सर्वत्र जोरदार स्वागत व कौतुक होत आहे.

आरोग्यसेवेतून जपली सामाजिक बांधिलकी…
दिवस-रात्र तणावाखाली काम करणाऱ्या पोलीस व प्रशासकीय यंत्रणेला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. हीच बाब ओळखून चोरडिया हॉस्पिटलने या ‘खाकी’ आणि प्रशासकीय योद्ध्यांसाठी पुढाकार घेतला आहे. वेळेवर झालेल्या आरोग्य तपासणीमुळे संभाव्य धोके टाळता येतात आणि गंभीर आजारांचे वेळीच निदान होण्यास मदत होते. त्यामुळे या शिबिराचे महत्त्व अधिक वाढले आहे.
विविध क्लिष्ट चाचण्या अन् तज्ज्ञांचे मार्गदर्शन…
या मोफत शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या वैद्यकीय चाचण्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने:
हृदय व फुफ्फुसांच्या चाचण्या: ईसीजी (ECG), छातीचा एक्स-रे (Chest X-Ray)
रक्ताच्या चाचण्या: सीबीसी (CBC), लिपिड प्रोफाइल (Lipid Profile), HbA1c (मधुमेह नियंत्रण चाचणी), एफबीएस (FBS), सीरम क्रिएटिनिन
इतर तपासण्या: थायरॉईड फंक्शन टेस्ट (Thyroid Function Test)
या सर्व अत्याधुनिक चाचण्यांसोबतच तज्ज्ञ डॉक्टरांकडून थेट सल्ला व मार्गदर्शनही दिले जाणार आहे.
वैद्यकीय वर्तुळातून डॉ. रोहित चोरडिया यांचे अभिनंदन…
रुग्णसेवेसोबतच सामाजिक जाणीव ठेवून हे पाऊल उचलल्याबद्दल डॉ. रोहित डी. चोरडिया आणि त्यांच्या संपूर्ण टीमवर विविध सामाजिक संघटना, नागरिक व प्रशासकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जनसेवेचा हा वारसा असाच पुढे चालू राहावा, अशी भावनाही यावेळी नागरिकांनी व्यक्त केली.

























