सुनिल तुगनायत,सिटी हब मिडिया वणी…
माळी समाज बहुउद्देशीय संस्था, वणीच्या वतीने संत शिरोमणी संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील इयत्ता १० वी आणि १२ वीच्या ७५% व त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा १५ ऑगस्ट रोजी शेतकरी मंदिर, वणी येथे उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वणी विधानसभेचे आमदार श्री. संजयभाऊ देरकर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार श्री. संजीवरेड्डी बोदकुरवार, सामाजिक प्रवक्ते श्री. समीरभाऊ लेनगुळे, संस्थेचे अध्यक्ष श्री. भवानीभाऊ मांदाडे, उपाध्यक्ष श्री. महेशभाऊ चौधरी, सचिव श्री. भास्करराव वाढई, श्री. राजूभाऊ मांदाडे, श्री. अमोलभाऊ गुरनुले, युवा अध्यक्ष श्री. अक्षय निकोडे आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. मायाताई लोहबडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार संजयभाऊ देरकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच माळी समाजासाठी शहरात भव्य समाज भवन उभारणीकरिता आपण सातत्याने कटिबद्ध व प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही दिली. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनीही आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि समाज भवनाच्या जागेसंदर्भात नगरपरिषद प्रशासन व नगराध्यक्षांकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे नमूद केले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. गजानन वाढई सर यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे सुसूत्र संचालन व उपस्थितांचे आभार श्री. नथुजी चौधरी सर यांनी मानले. या सोहळ्यास माळी समाज बांधव, भगिनी तसेच पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























