सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
शहरात वाहतुकीचे नियम मोडले की वाहतूक पोलीस तत्काळ सक्रिय होतात. एखाद्याची गाडी पांढऱ्या रेषेबाहेर आली किंवा पार्किंग झोन सोडून उभी राहिली, तर ५००० रुपयांपर्यंतचा दंड आकारला जातो. मात्र, आता याच नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या वाहतूक विभागाचा स्वतःचा ‘कारभार’ चक्क रस्त्याच्या मधोमध आला असून, त्यामुळे अपघाताची टांगती तलवार निर्माण झाली आहे.

नेमका प्रकार काय?
वणी-यवतमाळ रोडवर, साईबाबा मंदिराच्या जवळ असलेल्या हायमास्ट लॅम्पखाली वाहतूक पोलिसांची एक लोखंडी चौकी ठेवण्यात आली आहे. एकेकाळी बाजूला असलेली ही चौकी आता घसरत-घसरत चक्क मुख्य रस्त्याच्या मध्यभागी आली आहे. हा रस्ता केवळ अंतर्गत रस्ता नसून एक महत्त्वाचा राज्य महामार्ग आहे, जिथून दररोज शेकडो जड वाहने, बसेस आणि शालेय विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते.

जुलूम सामान्यांवरच का?
नागरिकांमधून आता संताप व्यक्त केला जात आहे. लोकांचे म्हणणे आहे की:
शहरात पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही…
रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्या (झेंब्रा क्रॉसिंग/पार्किंग लाइन्स) पुसट झाल्यामुळे पार्किंग कुठे करावी, हे समजत नाही.
अशा स्थितीत पोलीस सामान्यांवर दंडातून कारवाईची कुऱ्हाड चालवतात.
परंतु, जी पोलीस चौकी आता अपघाताला निमंत्रण देत आहे, ती बाजूला करण्यासाठी कुणालाही वेळ नाही. विशेष म्हणजे, या चौकीमध्ये कोणताही पोलीस कर्मचारी कधीही उभा नसतो. मग केवळ ‘अडथळा’ ठरणाऱ्या या रिकाम्या लोखंडी पेटीला रस्त्यात ठेवण्याचे प्रयोजन काय, असा सवाल विचारला जात आहे.
अपघाताची भीती…
रात्रीच्या वेळी किंवा गडद अंधारात या चौकीमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहतूक पोलीस दररोज याच रस्त्यावरून ये-जा करतात, तरीही त्यांना हा अडथळा दिसत नाही का? असा खोचक प्रश्न वणीचे नागरिक विचारत आहेत.
“वणीच्या नागरिकांचा सवाल
आमच्या एका चुकीच्या पार्किंगवर कारवाई करणारे प्रशासन, स्वतःच्या चौकीने रस्ता अडवला असताना गप्प का? या ‘शासकीय’ अडथळ्याचे चलन कोण फाडणार?”
आता प्रशासन या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन ती चौकी रस्त्यावरून हटवते की एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

























