सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा कामगार-शेतकरी नेते संजय खाडे यांचा वाढदिवस यंदा वणी विधानसभा क्षेत्रात मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीचे भान जपत साजरा करण्यात आला. नेहमीच्या बडेजावाला फाटा देत यंदा समर्थकांनी रक्तदान शिबिर, वृद्धाश्रमात मदत आणि रुग्ण सेवा अशा विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या सोहळ्याला वणी मतदारसंघातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

‘शेतकरी मंदिर’ येथे भव्य रक्तदान, १०० हून अधिक युनिट संकलन…
दिवसाची सुरुवात शेतकरी मंदिर येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिराने झाली. सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या शिबिराचा प्रारंभ झाला. तरुणाईने या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ हा संदेश सार्थ ठरवला. नागपूरच्या ‘लाइफलाईन रक्तपेढी’च्या सहकार्याने पार पडलेल्या या शिबिरात १०० पेक्षा जास्त नागरिकांनी रक्तदान केले.
पळसोनी येथील वृद्धाश्रमात मदतीचा हात आणि रुग्णालयात फळवाटप…
दुपारच्या सत्रात पळसोनी येथील बाजीराव वृद्धाश्रमाला कार्यकर्त्यांनी भेट दिली. येथील ज्येष्ठ नागरिकांना कपडे, पादत्राणे आणि रोजच्या गरजेच्या वस्तूंचे वाटप करून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. वाढदिवसाचा आनंद या वृद्धांसोबत वाटून कार्यकर्त्यांनी सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन घडवले. यासोबतच स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली.
खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते ‘डीएसके कंस्ट्रक्शन’चे उद्घाटन…

संध्याकाळच्या सत्रात एका व्यावसायिक उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. धनंजय खाडे यांच्या ‘डीएसके कंस्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स’ या नवीन कार्यालयाचे उद्घाटन चंद्रपूर-वणी-आर्णी क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते संध्याकाळी ६ वाजता पार पडले. उपस्थित मान्यवरांनी या नव्या व्यवसायाला शुभेच्छा दिल्या.
सायंकाळी रंगला अभिष्टचिंतन सोहळा…

यानंतर सायंकाळी ७ वाजता शेतकरी मंदिर येथे मुख्य अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व व्यापारी क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावून संजय खाडे यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. वणी विधानसभा क्षेत्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले कार्यकर्ते व नागरिकांच्या गर्दीमुळे परिसराला उत्सवी स्वरूप आले होते.
हा संपूर्ण दिनविशेष यशस्वी करण्यासाठी संजय खाडे फाउंडेशन, जय जगन्नाथ मल्टीस्टेट पतसंस्था, श्री लक्ष्मीनारायण पतसंस्था, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संजय खाडे मित्रपरिवाराने विशेष परिश्रम घेतले.

























