सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
रंगारीपुरा परिसरात पोलिसांची धडक कारवाई; धारदार सत्तूरसह संशयित ताब्यात…

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी वणी पोलिसांकडून सुरू असलेल्या विशेष गस्तीदरम्यान एक महत्त्वाची कारवाई करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी धारदार शस्त्र बाळगून फिरणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी पकडून त्याच्याविरुद्ध शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार (दि. १५ जून) रोजी वणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या निर्देशानुसार पोलीस पथक शहरातील विविध भागांत गस्त घालत होते. यावेळी रंगारीपुरा परिसरात एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
सदर व्यक्तीची चौकशी करून झडती घेतली असता त्याच्याकडून लोखंडी बनावटीचा धारदार सत्तूर आढळून आला. कोणतीही कायदेशीर परवानगी नसताना सार्वजनिक ठिकाणी असे घातक शस्त्र बाळगणे हा गंभीर प्रकार असल्याने पोलिसांनी तत्काळ ते शस्त्र जप्त केले.
या प्रकरणातील आरोपीची ओळख महेश रमेश मोहबिया (वय ३५, रा. रंगारीपुरा, वणी) अशी पटली आहे. आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल पाटील, पोलीस उपनिरीक्षक साजिद सैय्यद तसेच गजानन सावसाकडे, विशाल राठोड, आकाश अवचारे, मोनेश्वर खंडरे, गणेश मेश्राम आणि नंदकुमार पुप्पलवार यांच्या पथकाने पार पाडली.
शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालणाऱ्या तसेच बेकायदेशीररीत्या शस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


























