सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया…
दांडगाव शिवारातील मार्डा धरण परिसरात घडलेल्या विनोद सहारे या तरुणाच्या खळबळजनक खून प्रकरणाचा मारेगाव पोलिसांनी संपूर्ण पर्दाफाश केला आहे. मृतदेहाची ओळख पटवून मुख्य तीन सूत्रधारांना आधीच जेरबंद केल्यानंतर, आता पोलिसांनी या गुन्ह्यातील आणखी दोन फरार आरोपींना चंद्रपूर जिल्ह्यातून हुडकून काढत त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या ताज्या कारवाईमुळे या थरारक हत्याकांडातील एकूण अटकेत असलेल्या आरोपींची संख्या आता ५ झाली आहे.

जंगलातील मृतदेहापासून सुरू झालेला तपास…
काही दिवसांपूर्वी मार्डा धरणाजवळील निर्जन खड्ड्यात चंद्रपूर जिल्ह्यातील नागरी (ता. वरोरा) येथील विनोद प्रल्हादराव सहारे (वय ३५) या तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. मारेगाव पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे अवघ्या २४ तासांत या गुन्ह्याचा छडा लावत प्रवीण वरधने, राजू ढेंगळे आणि शंतनू झाडे या तिघांना सुरुवातीला अटक केली होती. कौटुंबिक वादाच्या रागातून हा पूर्वनियोजित कट रचून खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते.

आताची ताजी कारवाई: वरोऱ्यात घातला छापा…
या हत्येच्या कटात आणि अंमलबजावणीत आणखी काही जण सामील असून ते चंद्रपूर जिल्ह्यात लपल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तपास पथकाने तातडीने वरोरा तालुक्यात छापा टाकून राहत्या घरातून आणखी दोघांना ताब्यात घेतले.
अटकेतील नवीन आरोपी:
१. प्रशांत उर्फ परशु उर्फ ठमकेश्वर पंढरी घागी (वय २० वर्षे, रा. पावणा, ता. वरोरा)
२. कार्तिक सुनील निकोडे (वय १९ वर्षे, रा. नागरी, ता. वरोरा)
हे दोन्ही तरुण गुन्ह्यामध्ये थेट सहभागी असून हत्येनंतर फरार झाले होते. पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांना पळून जाण्याची संधी मिळाली नाही.
पोलिस यंत्रणेची कौतुकास्पद कामगिरी…
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार मारेगावचे पोलीस निरीक्षक सागर दानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रमोद जिद्देवार, एएसआय दिगंबर किनाके, शंकर बारेकर, तसेच पोलीस अंमलदार सागर दीपेवार आणि संभा लेणगुरे यांच्या विशेष पथकाने ही धडक मोहीम फत्ते केली.
आता या पाचही आरोपींना समोरासमोर बसवून पोलिसांकडून कसून चौकशी केली जाणार असून, गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे, वाहने जप्त करणे आणि हत्येचा संपूर्ण घटनाक्रम उलगडणे यावर पोलिसांचा मुख्य भर असणार आहे.


























