सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
नगरपरिषद शाळा क्रमांक ४ येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रभाग क्रमांक १३ व १४ मधील नगरसेवकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. वितरणामध्ये शालेय गणवेश व पाठ्यपुस्तकांचा समावेश होता.

या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका परसावर मॅडम यांनी नगरसेवकांना विशेष निमंत्रण दिले होते. शाळेच्या पहिल्याच दिवशी नवीन गणवेश व पुस्तके मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह स्पष्टपणे दिसून येत होता. पालकांनीही शासनाच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी होत असलेल्या प्रयत्नांचे स्वागत केले.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत प्रभाग क्रमांक १३ चे नगरसेवक सैफुर रहमान यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना मन लावून अभ्यास करण्याचे आवाहन करत, “आपल्या कुटुंबासह वणी शहराचे नाव उज्ज्वल करण्यासाठी शिक्षण हाच सर्वात मोठा मार्ग आहे,” असे सांगितले. तसेच शालेय जीवनातील दिवस पुन्हा कधीच परत येत नाहीत, शाळेतील मैत्री आयुष्यभर साथ देणारी असते. त्यामुळे आनंदाने शिक्षण घेत गमती-जमतींसोबत अभ्यासालाही तितकेच महत्त्व द्यावे, असा प्रेमळ सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमादरम्यान शाळा प्रशासनाने उपस्थित नगरसेवकांचा विद्यार्थ्यांशी परिचय करून दिला. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणात झाल्याने संपूर्ण शाळा परिसर उत्साहाने फुलून गेला.


























