सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी.
नव्या शैक्षणिक सत्राचे स्वागत करत रोटरी क्लब ब्लॅक डायमंड सिटी, वणी या सामाजिक संस्थेने विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. वणी नगर परिषदेच्या विविध शाळांमध्ये शिकणाऱ्या मुला-मुलींना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सुमारे ३,५०० वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्याअभावी कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये, या उदात्त हेतूने हा मदतीचा हात पुढे करण्यात आला.

रोटरी क्लबचे अध्यक्ष लव्हलेश लाल यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण उपक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संस्थेचे माजी अध्यक्ष अरुण कवाडकर, अनिल उत्तरवार, डॉ. परेश पटेल यांच्यासह प्रकल्प संचालक श्रेयश निखार आणि प्रकल्प सह-संचालक शुभम मदान प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच रोटेरियन सदस्य अश्विन कोंडावर, रविकांत खुराना, राज जैन, अक्षय खुराना व नीरज बोंगीरवार यांनीही या कार्यात सक्रिय सहभाग नोंदवला.

शाळांना भेटी आणि विद्यार्थ्यांशी संवाद…
क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नगर परिषदेच्या शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. वह्यांचे वाटप करण्यासोबतच मुलांनी नियमित अभ्यास करावा, वेळेचे नियोजन ठेवावे आणि शिक्षणाच्या जोरावर आपले भविष्य उज्ज्वल करावे, असा मोलाचा सल्लाही त्यांना देण्यात आला. रोटरी क्लबच्या या उपक्रमाचे सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालकांनी मनःपूर्वक आभार मानले.
“शिक्षण हीच खरी समाजसेवा” या ब्रीदवाक्याला स्मरून रोटरी क्लब ब्लॅक डायमंड सिटी, वणी ही संस्था आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असते. आर्थिक परिस्थितीमुळे मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी घेतलेला हा पुढाकार वणी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी नक्कीच दिशादर्शक ठरेल.


























