सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
(बातमीमध्ये एआई इमेज वापरली आहे…)
एका अल्पवयीन शाळकरी मुलीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अत्याचारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली असून, याप्रकरणी वणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.

साहिल सुखदेव काळे (वय २० वर्ष, रा. वणोजा देवी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही सध्या १२ वीच्या वर्गात शिकत आहे. आरोपी साहिलने १७ वर्षीय पीडित मुलीला आधी आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्यासोबत लग्न करण्याचे खोटे आश्वासन देऊन डिसेंबर २०२५ पासून तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
काही दिवसांनंतर पीडित मुलीच्या शरीरात बदल होत असल्याचे तिच्या कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने पालकांनी तिच्याकडे विचारपूस केली असता, तिने घडलेला सर्व धक्कादायक प्रकार अत्यंत भीतीने बोलून दाखवला. मुलीच्या बोलण्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
त्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांनी तात्काळ वणी पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून वणी पोलिसांनी तात्काळ हालचाली करत आरोपी साहिल काळे याला अटक केली आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ६४(१), ६९ आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर तपास सुरू करण्यात आला आहे.

























