सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
कत्तलीच्या उद्देशाने शेजारच्या तेलंगणा राज्यात होणारी गोवंशाची मोठी आंतरराज्यीय तस्करी यवतमाळ पोलिसांनी उधळून लावली आहे. स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि मुकुटबन पोलिसांनी संयुक्तपणे ही धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल ३४ जिवंत बैलांची क्रूरतेतून सुटका करण्यात आली असून, ५ वाहनांसह एकूण ४३ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी ६ तस्करांना रंगेहात पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

गुप्त माहितीच्या आधारे मध्यरात्री रचला सापळा…
चंद्रपूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या बाजारपेठांमधून गोवंश बैल गाड्यांमध्ये भरून ते मुकुटबन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजुर गोटा गावात आणले जात असल्याची खात्रीशीर माहिती यवतमाळ गुन्हे शाखेला ६ जुलै २०२६ च्या मध्यरात्री २:३० वाजताच्या सुमारास मिळाली. तस्कर या जनावरांना पैनगंगा नदीच्या पात्रातून तेलंगणा राज्यात पाठवण्याच्या तयारीत होते.
माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पथक आणि मुकुटबन पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी पहाटे ६:३० वाजता राजुर गोटा येथील प्रवासी निवाऱ्याजवळ छापा टाकला. यावेळी पिकअप वाहनांमधून जनावरे उतरवत असतानाच पोलिसांनी आरोपींना वेढा घालून ताब्यात घेतले.
३४ मुक्या प्राण्यांची क्रूरतेतून सुटका; ४३ लाखांचा मुद्देमाल जप्त…
पोलिसांनी घटनास्थळावरून ५ वाहने (ज्यात पिकअप आणि एक विना क्रमांकाचे अशोक लेलँड वाहन समाविष्ट आहे) जप्त केली, ज्यांची किंमत २६ लाख ५० हजार रुपये आहे. या वाहनांमध्ये आणि परिसरात सौर ऊर्जा खांब, बुद्ध विहार व सिमेंटच्या खांबांना चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता अत्यंत निर्दयतेने दाटीवाटीने बांधून ठेवलेले ३४ बैल आढळून आले. या १६ लाख ६५ हजार रुपये किमतीच्या सर्व जनावरांची सुटका करून, त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर वणी येथील ‘गुरु गणेश गोरक्षण रासा’ येथे सुरक्षिततेसाठी रवानगी करण्यात आली आहे.
तस्करांचे आंतरराज्यीय रॅकेट उघड…
पकडण्यात आलेल्या तस्करांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ५ आणि स्थानिक १ अशा ६ जणांचा समावेश आहे:
१) अक्षय किशोर बोढे (वय २९, रा. मोहाबाळा, वरोरा)
२) अजीज दादाजी बारतीने (वय २४, रा. आष्टी, भद्रावती)
३) प्रफुल शामराव नंदुरकर (वय २६, रा. येपसा, वरोरा)
४) विठ्ठल शंकर उमरे (वय ४६, रा. जामगाव खुर्द, वरोरा)
५) अजय भारत पिदूरकर (वय ३५, रा. सुकळी, वरोरा)
६) ज्ञानेश्वर उर्फ नागेश तानबा भोयर (वय ४०, रा. राजुर गोटा, यवतमाळ)
स्थानिक आरोपी ज्ञानेश्वर भोयर याने पोलिसांसमोर कबुली दिली की, तो आणि त्याचे फरार साथीदार किशोर खडसे व निलेश खडसे हे तेलंगणामधील व्यावसायिक मोहम्मद सलीम, नईम आणि इलियास यांच्या सांगण्यावरून मजुरी घेऊन ही जनावरे नदीपात्रातून तेलंगणात पाठवत होते. पोलीस सध्या फरार आरोपींचा कसून शोध घेत आहेत.
या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात झाली कारवाई…

ही धडक कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश चावरे आणि मुकुटबनचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दत्ता पेंडकर, पोउपनि सुदाम आसोरे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदूरकर, अमीत पोयाम, रजनीकांत मडावी, सतीश फुके आणि बादल जाधव या पोलीस अंमलदारांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

























