सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
वणी शहरात एका तरुणाने दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे एका व्यक्तीचे हरवलेले १ लाख ५० हजार रुपये त्यांना सुरक्षित परत मिळाले आहेत.
चिखलगाव येथील रहिवासी सुमित युवराज रांगणकर हे वणी येथील इक्विटस स्मॉल फायनान्स बँकेत नोकरीला आहेत. १८ जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास ते वणी बसस्थानकाच्या मागच्या रस्त्याने जात असताना त्यांना रस्त्यावर एक बॅग पडलेली दिसली. त्यांनी ती बॅग उघडून पाहिली असता त्यात ५०० रुपयांच्या नोटांची बंडले असलेली १ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम आणि खातेदाराच्या नावाचे काही चेक आढळून आले.
एवढी मोठी रक्कम सापडूनही सुमित यांनी कोणताही स्वार्थ न बाळगता मित्रासह थेट वणी पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांना सर्व प्रकार सांगितला. वणी पोलिसांनी बॅगेतील कागदपत्रांच्या आधारे तपास करून मूळ मालकाचा शोध घेतला आणि त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले.
रक्कम हरवलेले मूळ मालक सुरेश चंपत ठाकरे (रा. सावंगी) हे पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर, वणीचे ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या हस्ते त्यांची हरवलेली रक्कम त्यांना परत करण्यात आली. या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक महानवर, सहाय्यक पोलीस कॉन्स्टेबल अनिल, तसेच मूळ मालक व त्यांची पत्नी उपस्थित होते.

अचानक हरवलेली मोठी रक्कम परत मिळाल्याने सुरेश ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला. सुमित रांगणकर यांनी दाखवलेल्या या प्रामाणिक वृत्तीबद्दल पोलीस प्रशासन व वणी परिसरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे.

























