सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
स्थानिक जैताई मंदिर परिसरातील रहिवासी व महाराष्ट्र शासनाच्या खनिकर्म विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी प्रवीणभाई जयरामभाई ठक्कर (वय ८३) यांचे रविवारी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूच्या पश्चातही समाजासाठी उपयुक्त ठरण्याच्या उदात्त भावनेतून, त्यांच्या इच्छेनुसार चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला (मेडिकल कॉलेज) देहदान करण्यात आले.

दीड वर्षांपूर्वीच प्रवीणभाई यांचे ज्येष्ठ पुत्र दीपेश ठक्कर यांचे अकाली निधन झाले होते. या मोठ्या आघाताातून सावरत असतानाच प्रवीणभाईंच्या निधनाने ठक्कर कुटुंभावर दुःखाचा दुहेरी डोंगर कोसळला आहे. या कठीण आणि अत्यंत दुःखाच्या प्रसंगातही ठक्कर परिवाराने प्रवीणभाईंची इच्छा पूर्ण करत देहदानाचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे व सामाजिक दातृत्वाचे संपूर्ण परिसरातून मोठे कौतुक व आदर व्यक्त केला जात आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी वासंतीबाई, मुलगा मनीष, सुना, नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.
देहदानाचे महान कार्य…
मृत्यूनंतरही कोणाच्यातरी कामी येणे आणि वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाला गती देणे ही समाजासाठी सर्वात मोठी सेवा मानली जाते. देहदानामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी प्रत्यक्ष मानवी शरीराची उपलब्धता होते, ज्यामुळे भावी डॉक्टरांना अचूक प्रशिक्षण मिळण्यास मदत होते. जीवनात समाजाकडून बरेच काही घेतल्यानंतर, मृत्यूनंतर आपले शरीरच समाजाच्या आणि मानवतेच्या कल्याणासाठी सुपूर्द करणे हा अत्यंत उदात्त विचार आहे. ठक्कर परिवाराने दुःखाच्या प्रसंगातही घेतलेला हा निर्णय समाजाला अंधश्रद्धा व पारंपरिक रूढींमधून बाहेर पडून देहदानासारख्या अत्यंत क्रांतिकारी पावलाकडे वळण्यासाठी मोठी प्रेरणा देणारा ठरेल.

























