सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
‘पेट्रोल संपल्याने ‘मास्टर की’ टोळीचा डाव फसला; वणी पोलिसांकडून महावितरण कर्मचाऱ्याची दुचाकी हस्तगत…

मास्टर कीच्या सहाय्याने दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा डाव एका लिटर पेट्रोलमुळे फसला आहे. वणी शहरातून लांबवलेली महावितरण कर्मचाऱ्याची होंडा शाइन दुचाकी वणी पोलिसांनी शोधून काढली असून, वाहन मालकाकडे सुपूर्द केली आहे. इंधन संपल्यामुळे चोरट्यांनी गाडी झाडाझुडपात सोडून पळ काढला.

२७ जुलै रोजी घडली घटना:
२७ जुलै च्या रात्री वणी शहरातील महावितरण कार्यालयात कार्यरत असलेले मयूर तुरणकर यांनी आपली Honda Shine (क्रमांक MH 29 Q 7854) दुचाकी घरासमोर लॉक करून उभी केली होती. काही वेळातच अज्ञात चोरट्यांनी मास्टर कीचा वापर करून गाडीचे लॉक उघडले आणि गाडी घेऊन पसार झाले.
CCTV फुटेजमध्ये चोरीचा प्रकार कैद:
चोरीची ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. फुटेजमध्ये चार तरुण मास्टर कीने गाडीचे लॉक उघडून गाडी चालवत घेऊन जाताना स्पष्ट दिसत आहेत.सीसीटीव्ही फुटेज मध्ये या चोरट्यांमध्ये दोन अल्पवयीन व दोन वयस्क दिसत आहे…
गाडीमालकाने त्वरित वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
इंधन संपल्याने गाडी झुडपात टाकून पलायन:
वणी पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांचे डीबी पथक आणि विशेष तपास पथकाने शोधमोहीम राबवली. तपासादरम्यान वणी-मारेगाव मार्गावरील निंबाळा गावाजवळ एका झाडाझुडपात सदर दुचाकी आढळून आली. गाडीतील पेट्रोल संपल्यामुळे चोरट्यांनी गाडी तिथेच सोडून पळ काढला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. गाडीचे कोणतेही नुकसान झाले नाही.
नागरिकांनी सतर्क राहावे, पोलिसांचे आवाहन:
गाडी परत मिळाल्यानंतर मयूर तुरणकर यांनी वणी पोलिसांचे आभार मानले. मास्टर कीचा वापर करून गाड्या चोरणारी टोळी सक्रिय असण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आपल्या गाड्या सुरक्षित ठिकाणी पार्क कराव्या, अतिरिक्त सुरक्षा लॉकचा वापर करावा आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन ठाणेदार भानुदास पिदुरकर यांनी केले आहे.

























