सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
सोमनाळा ते चिखलगाव चौफुली या मुख्य रस्त्यावर बेकायदेशीरपणे सुरू असलेले कोल डेपो, कोळसा वॉशरी, डोलोमाईट भट्ट्या आणि त्यातून होणारी अनिर्बंध अवजड वाहतूक यामुळे संपूर्ण परिसरात धूळ आणि प्रदूषणाचे साम्राज्य पसरले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या सर्व गोंधळाला कंटाळाून परिसरातील १० ते १२ गावांतील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे न्यायाची मागणी केली आहे. “आता माघार नाही, निर्णयच हवा” असा थेट इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.

प्रदूषण अन् अपघातांच्या गर्तेत नागरिक…
सोमनाळा, निंबाळा, झरपट, राजूर, भांडेवाडा, सोनापूर, पळसोनी, मेघदूत कॉलनी, कळमना (लालपुलिया) आणि चिखलगाव परिसरातील रहिवासी, शेतकरी आणि विद्यार्थी धूळ व प्रदूषणामुळे श्वसनाच्या गंभीर आजारांनी त्रस्त आहेत. रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृतपणे उभ्या राहणाऱ्या अवजड गाड्यांमुळे नेहमीच वाहतूक कोंडी होते. त्यातच नियमांची पायमल्ली करत उलट्या दिशेने (Wrong side) धावणाऱ्या वाहनांमुळे निष्पापांचे बळी जात असून भविष्यात मोठ्या दुर्घटनेची टांगती तलवार कायम आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या:
१० दिवसांत संयुक्त बैठक: निवेदन स्वीकारल्यापासून पुढील १० दिवसांच्या आत सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन प्रश्नांवर ठोस तोडगा काढावा.
सुरक्षा उपायांची अंमलबजावणी: सोमनाळा ते चिखलगाव मार्गावर तातडीने स्पीड ब्रेकर, दुभाजक, दिशादर्शक आणि चेतावणी फलक लावावेत.
वाहतूक नियंत्रण व पोलीस चौक: चिखलगाव चौफुली येथे कायमस्वरूपी वाहतूक पोलीस, सिग्नल आणि पोलीस चौकी उभारण्यात यावी. तसेच कळमना येथील जिल्हा परिषद शाळेजवळ अधिकृत एसटी बस थांबा मंजूर व्हावा.
अनधिकृत डेपोंवर कारवाई: निवासी क्षेत्राच्या लेआऊटमध्ये व्यावसायिक कोल डेपोंना परवानगी देणाऱ्या प्राधिकरणाची चौकशी करून सर्व बेकायदेशीर डेपो तात्काळ हटवण्यात यावेत.
ओव्हरलोड व नियमबाह्य वाहतुकीवर आळा: क्षमतेपेक्षा जास्त कोळसा वाहून नेणाऱ्या वाहनांची वजन तपासणी करून दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करावी. गाड्यांवर ताडपत्री झाकणे आणि रस्त्यावर नियमित पाणी फवारणी बंधनकारक करावी.
एमपीसीबी (MPCB) अधिकारी नियुक्ती: प्रदूषण आणि पर्यावरणविषयक तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, वणी येथे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रतिनिधीची कायमस्वरूपी उपस्थिती असावी.
संयुक्त पाहणी समिती: महसूल, पोलीस, आरटीओ, सार्वजनिक बांधकाम आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त समितीने संपूर्ण परिसराचा पंचनामा करून अहवाल सादर करावा.
आंदोलनाचा इशारा:
येत्या १० दिवसांत प्रशासनाने या समस्यांवर ठोस उपाययोजना न केल्यास सर्व गावांतील नागरिक एकत्र येऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडतील, असा स्पष्ट इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.
यांची होती उपस्थिती:
या संयुक्त निवेदना प्रसंगी प्रवीण खानझोडे, राहुल क्षीरसागर (कळमना), राहुल कुत्तरमारे (सोमनाळा), अनिल डवरे (राजूर), मनोज ढेंगळे (निंबाळा), ऍड. कुमार मोहरमपुरी, ऍड. अरविंद सिडाम, मारोती आत्राम, सुभाष लसंते (निंबाळा), तुकाराम माथणकर (मानकी सरपंच), शिवाजी मोरे, अतुल चांदेकर, इमामुल हुसेन (मेघदूत कॉलनी), प्रकाश भट, क्रिष्णा चलाख (पळसोनी), आशिष रिंगोले, लेजू मडावी, मंगेश येटे, राजेश चांदेकर, शंकर धांडे (कळमना), आकाश दुबे, जफर खान, अशोक अंकतवार, संजय जाधव, रोशन गारपेलिवार यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

























