सुनिल तुगनायत सिटी हब मिडिया वणी…
वणी आगाराची बंद पडलेली वणी ते कृष्णानापूर मार्गावरील बससेवा अखेर आजपासून पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. शिवसेना (शिंदे गट) विधान परिषदेचे आमदार बच्चू कडू यांनी वणी आगार व्यवस्थापकांशी थेट संपर्क साधून दिलेल्या निर्देशानंतर ही बस धावू लागली असून, या पाठपुराव्यामुळेच बस तात्काळ सुरू झाल्याची माहिती शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांचे होत होते शैक्षणिक नुकसान…
मिलिंद एज्युकेशन सोसायटी अंतर्गत संचालित वेळाबाई येथील ‘नालंदा विद्यालया’त बोरगाव, आबई, कृष्णानापूर व मोहदा या परिसरातील खेड्यापाड्यांमधून अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी दररोज ये-जा करतात. हे विद्यार्थी शासनाच्या सवलत पासचा लाभ घेऊन शाळेत पोहोचतात. मात्र, वणी आगाराची सकाळी ९:०० वाजताची बस अचानक बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचता येत नव्हते, परिणामी त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत होते.
शेतकरी मंदिरात झालेल्या मेळाव्यात दिले होते निवेदन…
११ ऑगस्ट रोजी आमदार बच्चू कडू वणी येथील शेतकरी मंदिरात आयोजित मेळाव्यासाठी आले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन सकाळी ९:०० वाजता आणि दुपारी ३:३० वाजता ही बससेवा नियमित सुरू करावी, या मागणीसाठी नालंदा विद्यालयाचे मुख्याध्यापक राहुल विजय मानकर, विद्यार्थी व गावकऱ्यांनी आमदार बच्चू कडू यांची भेट घेऊन त्यांना प्रत्यक्ष निवेदन सादर केले होते.
आगार व्यवस्थापकांना थेट निर्देश अन् बस सुरू…
या निवेदनाची आमदार बच्चू कडू यांनी तत्काळ व गंभीर दखल घेतली. त्यांनी थेट वणी बस स्थानकावरील आगार व्यवस्थापकांशी (डेपो मॅनेजर) फोनवरून संपर्क साधला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी व प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी ही बस लवकरात लवकर सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. या सूचनेनंतर आगार प्रशासनाने तातडीने दखल घेत आजपासून वणी–कृष्णानापूर मार्गावर बससेवा पूर्ववत सुरू केली आहे.
आमदारांच्या या पाठपुराव्यामुळे बस सुरू झाल्याचे सांगत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, परिसरातील विद्यार्थी, पालक व नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

























