सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी, वणी तर्फे आयोजित आंतरशालेय नृत्य स्पर्धेत स्थानिक विद्यार्थ्यांनी आपल्या उत्तुंग कलागुणांचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली. देशभक्तीने ओतप्रोत अशा एकूण २३ नृत्याविष्कारांनी संपूर्ण सभागृहात राष्ट्रप्रेमाची ऊर्जा निर्माण केली…

कार्यक्रमाचा शुभारंभ पोलीस निरीक्षक भानुदास पीदूरकर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शेखर वांढरे, चंद्रकांत फेरवानी, अरुण कावडकर, क्लबचे अध्यक्ष अश्विनकुमार कोंडावार आणि सचिव अचल जोबनपुत्रा मंचावर उपस्थित होते.
नृत्य स्पर्धेचा निकाल…
गट ‘अ’ : संताजी इंग्लिश मीडियम स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला, तर बाल विद्या मंदिर उपविजेते आणि स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल तृतीय स्थानावर राहिले.
गट ‘ब’ : मॅकरून स्टुडंट्स अकॅडमीने बाजी मारत प्रथम स्थान मिळवले. स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूलने द्वितीय तर ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल स्कूलने तृतीय क्रमांक मिळवला.
सर्व विजेत्या शाळांना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
कलागुणांना वाव देण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे भान जपत रोटरी क्लब आणि सरस्वती हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबवण्यात आले. या शिबिरात १२५ बालकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमाचे संयोजन प्रकल्प संचालक धनु अग्रवाल व शुभम मदान यांनी चोख सांभाळले. सोहळ्याच्या यशस्वितेसाठी रोटरी क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कला आणि समाजहित यांचा उत्तम मेळ साधणाऱ्या या उपक्रमाचे शहरभरात कौतुक होत आहे…

























