सुनिल तुगनायत सिटी हब मिडिया वणी…
१३ ऑगस्टचा तो सकाळचा प्रहर…
वणीच्या वातावरणात एरवीपेक्षा एक वेगळीच ऊर्जा, शिस्त आणि देशभक्तीचा अनोखा उत्साह संचारला होता. मी आजवर अनेक धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांच्या यात्रा जवळून पाहिल्या, त्यांचं वार्तांकन केलं. मात्र, स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आणि ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत वणी शहरात देशभक्त नागरिकांच्या पुढाकाराने निघालेली ही ‘भव्य तिरंगा यात्रा’ आजवरच्या सर्व आयोजनांपेक्षा पूर्णपणे वेगळी आणि ऐतिहासिक ठरली. जात, पात, धर्म आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवून प्रत्येक वणीकर केवळ ‘एक भारतीय’ म्हणून रस्त्यावर उतरला होता. त्यामुळेच हातात मोबाईल घेऊन वार्तांकन करताना मी मातीचा एक अभिमानी नागरिक म्हणून या प्रवाहात पूर्णपणे एकरूप झालो होतो.
क्षण न् क्षण टिपण्यासाठी पायाला भिंगरी आणि मोबाईलचा कॅमेरा…
या ऐतिहासिक सोहळ्याचा कोणताही क्षण निसटू नये म्हणून माझी अक्षरशः धावपळ सुरू होती. पायाला भिंगरी बांधल्यासारखा मी संपूर्ण यात्रेत पुढे-मागे फिरत होतो. माझा मुख्य उद्देश केवळ मंचावरचे नेते टिपणे हा नव्हता; तर तासनतास चालणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांचे निरागस हास्य, घोषणा देताना तरुणांच्या चेहऱ्यावरील जोश आणि सामान्य नागरिकांचे भाव-विश्व मला माझ्या मोबाईलमध्ये साठवायचे होते. मोबाईलचे स्टोरेज वारंवार फुल होत होते, पण त्याची तमा न बाळगता मी चौकाचौकांत जाऊन लोकांच्या भावना, त्यांचे लहान-लहान बाईट्स आणि उत्स्फूर्त प्रतिक्रिया टिपत राहिलो. माझी ही धडपड शेवटी सार्थकी लागली आणि एका अप्रतिम व्हिडिओ दस्तऐवजासह हा बातमीपर लेख आकारास आला.
विश्रामगृह ते प्रमुख मार्ग: १ किमी लांब शिस्तबद्ध रांग…
सकाळी ८ वाजल्यापासूनच स्थानिक विश्रामगृहाच्या परिसरात विविध शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, शिक्षकवृंद, निवृत्त सैनिक, महिला बचत गट आणि ज्येष्ठ नागरिकांचे आगमन सुरू झाले होते. सकाळी ९:३० वाजता विश्रामगृहातून ही यात्रा सुरू झाली आणि पाहता पाहता प्रमुख मार्गावर तब्बल एक किलोमीटर लांब शिस्तबद्ध रांग तयार झाली. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार,माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे ,माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर, स्वीकृत सदस्य रवि बेलुरकर,नगराध्यक्षा विद्याताई आत्राम, भाजप शहराध्यक्ष नीलेश चौधरी,माजी नगरसेवक संतोष डंभारे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी कोणत्याही बडेजावाशिवाय सर्वसामान्यांच्या खांद्याला खांदा लावून पायी चालत होते. संपूर्ण यात्रेत कुठेही राजकीय पक्षाचे झेंडे किंवा बॅनर नव्हते; प्रत्येकाच्या हातात फक्त आणि फक्त डौलाने फडकणारा राष्ट्रध्वज तिरंगा होता.
महापुरुषांना वंदन करत ४ किमीचे मार्गक्रमण…
ही तिरंगा यात्रा विश्रामगृहावरून निघून छत्रपती शिवाजी महाराज चौक, खाती चौक, महात्मा गांधी चौक, संत गाडगे बाबा चौक, शहीद भगतसिंग चौक, सर्वोदय चौक, रवींद्रनाथ टागोर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे लोकमान्य टिळक चौकापर्यंत पोहोचली. या ४ किलोमीटरच्या प्रवासात २५०० हून अधिक नागरिकांचा जनसमुदाय स्वयंस्फूर्तीने “भारत माता की जय”, “वंदे मातरम” आणि “जन-जन का नारा है, भारत देश हमारा है” अशा गगनभेदी घोषणा देत मार्गक्रमण करत होता.
सामाजिक संस्थांचा सेवाभाव आणि अभूतपूर्व स्वागत…
यात्रेदरम्यान वणीतील विविध सामाजिक व व्यापारी संघटनांचा सेवाभाव डोळ्यात भरणारा होता. जैन समाजाची ‘श्री महावीर बहुउद्देशीय सेवा संस्था’, सिंधी समाज संघटना, स्नेहा डेअरी, अंकुश मोबाईल शॉपी तसेच स्थानिक व्यापारी बांधवांनी जागोजागी विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी आणि बिस्किटांचे वाटप केले. चौकाचौकांत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे थांबून यात्रेवर पुष्पवृष्टी केली.
स्वच्छतेचा संदेश, पोलिसांचा बंदोबस्त आणि महाप्रसाद…
या रॅलीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचे शिस्तबद्ध नियोजन आणि स्वच्छता! यात्रा पुढे जात असताना नगर परिषद वणीचे सफाई कर्मचारी मागून तत्परतेने स्वच्छता करत होते. वणी पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून यात्रेत सहभाग नोंदवला. टिळक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ संपूर्ण ‘वंदे मातरम’चे सहाही छंद आणि राष्ट्रगीत गाऊन यात्रेची सांगता झाली. यानंतर राष्ट्रीय ध्वजाचा पूर्ण सन्मान राखत सर्व तिरंगे सुरक्षितपणे गोळा करण्यात आले. रॅली संपल्यानंतर विश्रामगृहावर सर्व विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांसाठी अल्पोपहार व महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
मोबाईलच्या स्क्रीनमध्ये हजारो तिरंगे उंच फडकताना टिपताना वणीकरांच्या या अभूतपूर्व एकतेचा भाग असल्याचा मला मनापासून अभिमान वाटला. “तिरंगा आहे अभिमान, ठेवू त्याचा सदैव मान” हा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरवणारा हा ऐतिहासिक सोहळा वणीच्या इतिहासात कायम स्मरणात राहील.

























