सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम, गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठांचा सत्कार; सांस्कृतिक कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद.

येथील जत्रा मैदान परिसरातील हनुमान मंदिर स्थित श्री संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिरात शुक्रवार, दिनांक २१ ऑगस्ट २०२६ रोजी संत शिरोमणी नरहरी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात, भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली. या महोत्सवात सुवर्णकार समाज बांधव, महिला मंडळ व युवक मंडळाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुवर्णकार समाज शाखा सल्लागार श्री. दिलीपभाऊ प्रल्हादपंत रेभे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून वणी उपविभागीय वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक (PI) मा. श्री. नरेशजी रणधीर साहेब, रिलायन्स सिमेंट कंपनी (मुकुटबन) चे जनरल मॅनेजर तथा एच.आर. हेड मा. श्री. जितेंद्रजी कुर्वे साहेब, तसेच सराफा असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्री. जयेशजी कोटेचा प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी भारतीय सुवर्णकार समाज शाखा (वणी) चे अध्यक्ष श्री. विकास देविदासपंत चांदवडकर, कार्याध्यक्ष तथा सुवर्ण अलंकार तालुका प्रतिनिधी श्री. अनिल प्रल्हादपंत रेभे, महिला शाखेच्या अध्यक्षा सौ. पूर्वा पियुष बांगरे, उपाध्यक्षा सौ. गायत्री शिंपी, सचिव सौ. सोनल प्रवीण टिकले, कोषाध्यक्ष श्री. जितेंद्र मस्के, सचिव श्री. सारंग चांदवडकर यांच्यासह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.
विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांची रेलचेल…
उत्सवाची सुरुवात सकाळी श्रींच्या मूर्तीची विधिवत पूजा व महाअभिषेकाने झाली. त्यानंतर साईकृपा गुरुदेव भजन मंडळाच्या सुश्राव्य भजनाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. महिलांसाठी हळदी-कुंकू, पारंपारिक दहीहंडी व गोपाळकाला उत्साहात पार पडला.
गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचा गौरव…
या सोहळ्यात समाजातील १० वी व १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच समाजातील ज्येष्ठ समाजसेवक व ज्येष्ठ महिलांचा (श्री. वासुदेवरावजी डुंबरे, श्री. सुभाषराव कोणप्रतिवार, श्री. ओमराजजी फावे, श्री. श्रीधर निरजापुरे, सौ. निर्मलाताई डुंबरे, सौ. अरुणाताई मंजुळकर, सौ. शांताबाई डुंबरे आदी) मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात आला. उपस्थित पाहुण्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रम व महाप्रसाद…
दुपारी समाजबांधवांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर लहान मुलांसाठी व युवकांसाठी डान्स स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा यांसारखे रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले आणि विजेत्यांना बक्षिसे वितरित करण्यात आली. सायंकाळी महाआरतीने महोत्सवाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संतोष वसंतराव करंडे (उपाध्यक्ष) यांनी केले.
हा उत्सव यशस्वी करण्यासाठी समस्त सुवर्णकार समाज कार्यकारणी मंडळ, महिला मंडळ, युवक मंडळ व समाजबांधवांनी अथक परिश्रम घेतले.
“जय नरहरी… जय सुवर्णकार!” च्या जयघोषाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

























