सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
शिंदोला–येनक–साखरा–जुगाद (एमटीडीआर-७९) या मार्गावर झालेल्या निकृष्ट डांबरीकरणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. काम पूर्ण होऊन जेमतेम तीन महिने उलटत नाहीत तोच आदर्श हायस्कूल, शेवाळा फाटा आणि कोलगाव परिसरातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून रस्ता पुन्हा दुरवस्थेत गेला आहे. या अनागोंदी कारभाराविरोधात नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर जोरदार ताशेरे ओढले.

या समस्येवर तातडीने तोडगा काढण्यासाठी आयुष रोहिदास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पांढरकवडा येथील कार्यकारी अभियंत्यांच्या नावे वणी उपविभागीय कार्यालयात निवेदन देण्यात आले.
अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे संताप, कार्यालयात घोषणाबाजी…
शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी पोहोचले असता संबंधित उपविभागीय अभियंता जागेवर हजर नव्हते. यामुळे उपस्थित नागरिक व कार्यकर्त्यांचा संयम सुटला आणि त्यांनी कार्यालयाच्या आवारातच प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या गोंधळानंतर अधिकारी तातडीने कार्यालयात दाखल झाले, त्यानंतर त्यांना मागण्यांचे निवेदन सोपवण्यात आले.
तांत्रिक चौकशी व फेरकामाची मागणी…
सदर रस्त्याचे कंत्राट यवतमाळच्या बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेडकडे सोपवण्यात आले होते. मात्र, कंत्राटदाराने करारातील निकष व तांत्रिक नियमांना हरताळ फासल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या संदर्भात यापूर्वी १४ ऑक्टोबर २०२४ रोजीही प्रशासनाला अपघातांचा वाढता धोका आणि उडणाऱ्या धुळीमुळे शेतकरी व प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबाबत अवगत करण्यात आले होते.
नागरिकांनी निवेदनात पुढील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत:
रस्त्याचे आरेखन (डिझाईन), शेड्युल आणि पुलांच्या बांधकामाची तज्ज्ञांमार्फत तांत्रिक तपासणी व्हावी.
निकृष्ट दर्जाचा रस्ता पूर्णपणे उखडून नव्याने दर्जेदार काम करण्यात यावे.
कामात हलगर्जीपणा करणारे दोषी अधिकारी व संबंधित कंत्राटदारावर कडक कारवाई निश्चित करावी.
मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास ३१ ऑगस्टला रास्ता रोको…
“जनतेच्या करातून उभा राहिलेला निधी अशा प्रकारे निकृष्ट कामात वाया घालवणे खपवून घेतले जाणार नाही,” असा इशारा आंदोलकांनी दिला. प्रशासनाने तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करून रस्ता पूर्ववत न केल्यास येत्या ३१ ऑगस्ट रोजी तीव्र ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडण्यात येईल, तसेच यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी बांधकाम विभागाची राहील, असा निर्वाणीचा इशाराही देण्यात आला.
प्रमुख उपस्थिती…
यावेळी आयुष ठाकरे यांच्यासह अजिंक्य शेंडे, प्रणय बदखल, भगवान मोहिते, रवी वाटेकर, कार्तिक आत्राम, लता ठावरी, दादु गोरे, अनिकेत बलकी, पियुष हजारे, प्रवीण डोहे आणि सुदर्शन शिंदे यांच्यासह परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























