सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
आगामी ईद आणि इतर महत्त्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी वणी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी आणि समाजकंटकांवर वचक राहावा, या उद्देशाने वणी पोलिसांनी शहराच्या प्रमुख मार्गांवरून आणि संवेदनशील भागांतून आज भव्य रूट मार्च (संचलन) काढला.

सण-उत्सवांच्या काळात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आला.
शांतता समितीच्या बैठकीत महत्त्वाचे आवाहन…
सणांच्या काळात सामाजिक सलोखा आणि शांतता टिकून राहावी, यासाठी पोलिसांनी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन ही केले होते.

प्रमुख मुद्दे व सुरक्षा व्यवस्था:
प्रमुख मार्गांवरून संचलन: शहरातील मुख्य चौक, संवेदनशील भाग आणि बाजारपेठेतून पोलिसांचा मोठा फौजफाटा रूट मार्चमध्ये सहभागी झाला.
कडक बंदोबस्त: सणांच्या काळात शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी, गस्त आणि गुप्त माहितीच्या आधारे विशेष नजर ठेवली जाणार आहे.
नागरिकांना आवाहन: नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शांततेत, आनंदाने आणि उल्हासात सण साजरे करावेत, तसेच संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सण-उत्सवांच्या काळात शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी वणी पोलीस पूर्णपणे सज्ज झाले आहेत.

























