सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
राज्यातील सत्ताकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय उलथापालथीची चिन्हे दिसत आहेत. नवरात्रोत्सवापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तब्बल १४ आमदार पक्षांतर करून शिंदे गटात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संभाव्य हालचालींना राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर-२’ असे नाव दिले जात असून, यामुळे ठाकरे गटाला विधानसभा पातळीवर मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तीन मंत्र्यांवर विशेष जबाबदारी…
शिंदे गटाकडून या मोहिमेची धुरा कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील तीन वजनदार मंत्र्यांकडे सोपवण्यात आल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटातील अनेक आमदार सत्ताधारी गटाच्या सतत संपर्कात आहेत. यातील काही आमदारांनी पक्षप्रवेशाच्या बदल्यात मंत्रिपद, मर्जीतील खाती अथवा महामंडळांचे अध्यक्षपद यांसारख्या मागण्या ठेवल्याचा दावा केला जात आहे.
‘मातोश्री’वर तातडीची खलबते; फोन रेकॉर्ड करण्याचे निर्देश…
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तातडीने बैठक बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला:
* पुरावे गोळा करण्याचे आदेश: पक्षाच्या कोणत्याही लोकप्रतिनिधीला किंवा पदाधिकाऱ्याला फोडण्यासाठी मध्यस्थ अथवा विरोधकांचा संपर्क झाल्यास संभाषणाचे रेकॉर्डिंग करून ते थेट नेतृत्वाकडे सादर करण्याचे स्पष्ट आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले.
* अडकवण्याचा डाव निष्फळ ठरेल: ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांनी आरोप केला की, शिंदे गटाशी संबंधित काही घटक आमच्या नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र पक्षाचा कोणताही लोकप्रतिनिधी फुटणार नाही.
‘लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळणार’; उदय सामंत व अर्जुन खोतकरांचे संकेत…
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या संभाव्य घडामोडींवर भाष्य करताना स्पष्ट केले की, लवकरच राज्याला मोठी ब्रेकिंग न्यूज मिळू शकते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व सर्वदूर लोकप्रिय असून ते सर्वांना मान्य आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांपासून थेट आमदारांपर्यंत सर्वच लोकप्रतिनिधी शिंदे यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास दाखवत पक्षात येण्यास उत्सुक असल्याचा मोठा दावा त्यांनी केला.
दुसऱ्या बाजूला शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांनीही ‘ऑपरेशन टायगर’ अखंडपणे सुरू असल्याचे सांगत पक्षाची दारे सर्वांसाठी सदैव खुली असल्याचे स्पष्ट केले.

























