सुनिऋ तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
चोरी करून शेकडो किलोमीटर दूर पळून गेलेल्या चोराचा माग काढत, शिरपूर पोलीस ठाण्याच्या महिला तपास अंमलदाराने थेट गडचिरोली गाठून चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे. शिरपूर ते गडचिरोली असा कसून तपास करत पोलिसांनी चोरीस गेलेली २५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात मोठे यश मिळवले आहे.
नेमकी घटना काय?
शिरपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अप क्र. ४०६/२०२६ (कलम ३०३(२) भा.न्या.सं.) नुसार, आरोपी राजेश बाबुलाल डोनेकर (रा. देवडीपार, ता. गोरेगाव, जि. गोंदिया) हा गुन्हा घडल्यापासून पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला होता.
तपासाची चक्रे गडचिरोलीपर्यंत फिरली…
ठाणेदार संतोष मनवर यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याची तपास चक्रे अत्यंत वेगाने फिरवण्यात आली. तपासाची धुरा सांभाळणाऱ्या महिला पोलीस हवालदार रंजना सोयाम यांनी तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. हा तपास थेट गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज (वडसा) पर्यंत पोहोचला.
देसाईगंज येथे सापळा रचून कारवाई करत पथकाने २४ ऑक्टोबर रोजी गुन्ह्यात चोरीस गेलेली २५ हजार रुपये किमतीची हिरो होंडा/दुचाकी (क्रमांक MH 29 AZ 3909) जप्त केली.
या धडक कारवाईत महिला पोलीस हवालदार रंजना सोयाम यांच्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर दराडे, विजय फुलुके आणि होमगार्ड घाग्गी यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. एका महिला अंमलदाराने दाखवलेले हे धाडस आणि कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

























