सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रणधुमाळीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जोरदार मुसंडी मारत दणदणीत विजय खेचून आणला. या घवघवीत यशानंतर वणी मतदारसंघाचे आमदार संजय देरकर यांच्या पुढाकाराने नवनिर्वाचित संचालक व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुंबई येथील ‘मातोश्री’ निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दीपावली सणाच्या निमित्ताने पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देत त्यांच्याकडून भावी वाटचालीसाठी आशीर्वाद घेतले.
या औपचारिक सदिच्छा भेटीदरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील पक्षाचा वाढता प्रभाव आणि गावपातळीवरील संघटनात्मक बांधणी यावर सखोल चर्चा झाली. कार्यकर्त्यांची तळमळ आणि निष्ठेमुळेच सहकारात हा विजय मिळवता आला, असे मत यावेळी मांडण्यात आले.
या बैठकीत केवळ विजयाचा आनंदोत्सव साजरा न करता जिल्ह्यातील बळीराजाच्या व्यथांवरही गांभीर्याने विचारमंथन झाले. विदर्भातील कोरडवाहू पट्ट्यात निर्माण झालेली दुष्काळसदृश स्थिती आणि अडचणीत सापडलेला शेतकरी वर्ग यासंदर्भात आमदार देरकर यांनी पक्षप्रमुखांना सविस्तर माहिती दिली. यावर बोलताना, संकटसमयी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आक्रमकपणे रस्त्यावर उतरा आणि बळीराजाला संपूर्ण सहकार्य करा, असे स्पष्ट आदेश उद्धव ठाकरे यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींना दिले.
या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान ज्येष्ठ नेते व खासदार अरविंद सावंत, संपर्कप्रमुख अनिल आगळे, जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड यांच्यासह नवनिर्वाचित संचालिका किरण देरकर आणि संचालक सुनील कातकडे उपस्थित होते. याशिवाय जिल्हाप्रमुख किशोर इंगळे, संजय निखाडे, प्रवीण शिंदे, उपजिल्हाप्रमुख शरद ठाकरे, अविनाश भुजबळराव, तसेच वणी तालुकाप्रमुख संतोष कुचनकर, मारेगाव तालुकाप्रमुख पुरुषोत्तम बुट्टे, झरी तालुकाप्रमुख सतीश आदेवार यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख शिवसैनिकांची मोठी उपस्थिती होती. या विजयामुळे जिल्ह्यात पक्षाला नवी ऊर्जा मिळाली असून सहकाराच्या माध्यमातून जनसेवेचा वसा अधिक दृढ करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

























