सिटी हब मिडिया वणी…
तस्करी प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर संशय; युवासेनेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन…
वणी शहरात उघडकीस आलेल्या सुगंधित तंबाखू तस्करी प्रकरणात तपास प्रक्रियेवर गंभीर संशय व्यक्त करत अजिंक्य सुभाष शेंडे, उपजिल्हा प्रमुख युवासेना, यवतमाळ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह यवतमाळचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर केले. या प्रकरणात दोषी तपास अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करून तस्करीत वापरलेली वाहने व संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दिनांक ८ डिसेंबर २०२५ रोजी पंचशील नगर, वणी येथे जागरूक नागरिकांनी ‘११२’ क्रमांकावर दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू जप्त केली होती. या कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अत्यंत गंभीर कलमान्वये गुन्हे नोंदवले असतानाही तपासाची गती संशयास्पद असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तस्करीसाठी वापरण्यात आलेली MH-24-BL-7051 व MH-24-BL-7951 क्रमांकाची वाहने, त्यांचे चालक व मालक यांची संपूर्ण माहिती पोलिसांकडे उपलब्ध असूनही एक महिना उलटून गेल्यानंतरही ही वाहने जप्त करण्यात आलेली नाहीत. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्ष साक्षीदार असतानाही कारवाई न होणे ही बाब पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी असल्याचे युवासेनेचे म्हणणे आहे.
वाहने जप्त न केल्यामुळे तंबाखू तस्करीमागील आर्थिक साखळी व सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यात अडथळा निर्माण होत असून, हा प्रकार केवळ प्रशासकीय निष्काळजीपणा नसून आरोपींना जाणीवपूर्वक वाचवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच संबंधित तपास अधिकाऱ्याची भूमिका संशयास्पद असून, त्यामुळे शहरात बेकायदेशीर धंद्यांना अप्रत्यक्ष पाठबळ मिळत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असल्याचेही नमूद करण्यात आले.
युवासेनेच्या वतीने तस्करीत वापरलेली वाहने तात्काळ जप्त करावीत, त्यांचे मालक व चालकांवर कठोर कारवाई करावी, अन्न व औषध प्रशासनाने नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार तंबाखू मागवणाऱ्या मुख्य आरोपीस त्वरित अटक करावी तसेच तपासात जाणीवपूर्वक दिरंगाई करणाऱ्या संबंधित तपास अधिकाऱ्याला निलंबित करावे, अशा ठोस मागण्या करण्यात आल्या आहेत.
येत्या ४८ तासांत ठोस कारवाई न झाल्यास युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. जनतेचा पोलिस प्रशासनावरील विश्वास अबाधित राहावा यासाठी पोलीस अधीक्षकांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी युवासेनेने केली आहे.
या वेळी युवासेना समन्वयक आयुष ठाकरे, सुरेश शेंडे यांच्यासह युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

























