महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणारी एक अत्यंत गंभीर घटना समोर येत असून, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विमानाला बारामतीजवळ लँडिंगदरम्यान भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. विविध मराठी व हिंदी वृत्तवाहिन्यांवर ही बातमी प्रसारित होत असून, या घटनेमुळे राज्यभरात शोककळा पसरली आहे.

वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार हे एका जाहीर सभेसाठी बारामतीकडे विमानाने रवाना झाले होते. मात्र बारामती परिसरातील गुजोवाबी भागात लँडिंगदरम्यान कमी दृष्टीक्षेपामुळे (Low Visibility) विमान जमिनीवर आदळले. अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली.
या विमानात अजित पवार यांच्यासह इतर पाच ते सहा जण प्रवास करत होते. अपघातानंतर स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वृत्तवाहिन्यांच्या दाव्यानुसार, गंभीर भाजल्यामुळे अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, कुटुंबीय, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे बारामतीकडे रवाना झाल्याचे वृत्त आहे. रुग्णालय परिसरात समर्थक व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली असून वातावरण अत्यंत शोकाकुल झाले आहे.
दरम्यान, डीजीसीए (DGCA) कडून विमान अपघात झाल्याची व यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सगळ्यांचा मृत्यू झाला आहे प्राथमिक माहिती देण्यात आली असून, मात्र अजूनही राज्य सरकार, मुख्यमंत्री कार्यालय किंवा अधिकृत यंत्रणांकडून याबाबतची अंतिम व लेखी पुष्टी येणे बाकी आहे.
सध्या सुरू असलेल्या वृत्तवाहिन्यांच्या ब्रेकिंगनुसार ही घटना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत धक्कादायक ठरल्याचे सांगितले जात आहे.

























