सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
येथील प्रतिष्ठित शिक्षण प्रसारक मंडळाच्या चिखलगाव मार्गावरील विस्तीर्ण ३२ एकर जागेतून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपये किमतीच्या बांबूच्या झाडांची झुडपे आणि सुबाभुळीची झाडे कापून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद अरुण खानझोडे यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

नेमकी घटना काय?
शिक्षण प्रसारक मंडळ, वणी यांच्या मालकीची मौजा चिखलगाव, यवतमाळ रोडवर ३२ एकर जमीन आहे. या जागेवर संस्थेमार्फत सहा वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले होते. १७ मार्च २०२६ रोजी संध्याकाळच्या सुमारास ही चोरी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
जेव्हा फिर्यादी डॉ. खानझोडे हे ग्राउंडच्या मोजमापासाठी या जागेवर गेले असता, त्यांना त्या ठिकाणी असलेली हिरवीगार झाडे गायब असल्याचे दिसून आले. सखोल पाहणी केली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी बांबूची झुडपे आणि मौल्यवान सुबाभुळीची झाडे कापून चोरून नेल्याचे स्पष्ट झाले.
चोरीला गेलेला माल आणि किंमत:
चोरट्यांनी अत्यंत शिताफीने खालील वृक्षांची चोरी केली आहे:
बांबूची झुडपे: एकूण १४ झुडपे (अंदाजे २१० बांबू), ज्याची किंमत ७३,५०० रुपये आहे.
सुबाभूळ झाडे: १० मोठी झाडे, ज्याची अंदाजे किंमत २५,००० रुपये आहे.
एकूण मुद्देमाल: ९८,५०० रुपये (सुमारे १ लाख रुपये).
पोलीस कारवाई:
या प्रकरणी डॉ. प्रसाद खानझोडे यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून वणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ (२) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार (बकल नं. १०२०) नीलकमल भोसले करीत आहेत. शैक्षणिक संस्थेच्या जागेतून अशा प्रकारे दिवसाढवळ्या झाडांची चोरी झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून चोरट्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

























