सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
शहरात सध्या शुद्ध पिण्याच्या पाण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर तेजीत आहे. मात्र, हे पाणी घरपोच पोहोचविणाऱ्या वाहनचालकांच्या वाढत्या मुजोरीमुळे वणीकर नागरिक त्रस्त झाले आहेत. गल्लोगल्ली पाणी पुरवठा करताना ही वाहने रस्त्याच्या मधोमध उभी केली जात असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे, तर जाब विचारणाऱ्यांना उद्धट भाषेचा सामना करावा लागत आहे.

वाहतुकीची कोंडी आणि हुज्जत…
वणी शहराच्या विविध भागांत १० ते २० रुपयांत २० लिटर पाणी देणारे अनेक प्लांट कार्यान्वित आहेत. हे पाणी ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी छोट्या मालवाहू गाड्यांचा वापर केला जातो. नियमानुसार रस्ता मोकळा ठेवून पाणी वितरण करणे अपेक्षित असताना, हे चालक आपली वाहने थेट रस्त्याच्या मध्यभागी उभी करतात. यामुळे पाठीमागून येणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना मोठा अडथळा निर्माण होतो. नागरिकांनी गाडी बाजूला घेण्याची विनंती केल्यास, “दोन मिनिटे थांबा, आमचे काम सुरू आहे,” अशा शब्दांत हे चालक अरेरावी करतात. अनेकदा तर हुज्जत घालण्यापर्यंत त्यांची मजल जाते.
पाणी शुद्धतेचा प्रश्न कायम…
नगर परिषदेमार्फत सध्या शहरात अत्याधुनिक शुद्धीकरण यंत्रणा नसल्याचा फायदा खाजगी प्लांट धारकांनी घेतला आहे. ठिकठिकाणी वॉटर एटीएम आणि फिरती केंद्रे सुरू झाली आहेत. मात्र, हे पाणी नेमके किती फिल्टर केलेले आणि आरोग्यासाठी सुरक्षित आहे, याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह कायम आहे. शुद्ध पाण्याचा नावाखाली सुरू असलेल्या या व्यवसायाला आता ‘मुजोरी’चे ग्रहण लागले आहे.
प्रशासकीय हस्तक्षेपाची गरज…
या सर्व प्रकारात मुख्य दोष हा वाहनचालकांचा असला, तरी संबंधित प्लांट मालकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावणे गरजेचे आहे. यासोबतच:
पोलीस प्रशासनाने अशा बेजबाबदार चालकांवर दंडात्मक कारवाई करावी.
नगर परिषदेने या अनधिकृतपणे रस्ता अडवणाऱ्या वाहनांना ताकीद द्यावी.
नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाने वेळीच लगाम लावण्याची नागरिकांनी मागणी केली आहे…
रस्त्यावरील या त्रासामुळे सर्वसामान्य नागरिक संताप व्यक्त करत असून, प्रशासनाने या ‘वॉटर माफिया’च्या चालकांना वेळीच आवर घालावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
बातमीत एआई इमेज वापरली आहे…

























