सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
शहरातील दीपक चौपाटी नगरपरिषद कॉम्प्लेक्सच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे चालणाऱ्या वरली मटका जुगारावर वणी पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीला रंगेहात पकडले असून, मुख्य मालकासह दोघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार बंदी कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार, १८ मे रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पोलीस हवालदार अविनाश वामनराव चिकराम (वय ३६) यांना दीपक चौपाटी परिसरात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पंचांसह घटनास्थळी छापा टाकला असता, आरोपी अब्दुल शब्बीर अब्दुल रहेमान (वय ५७, रा. मोमीनपुरा, वणी) हा लोकांकडून पैसे घेऊन त्यांना वरली मटक्याचे आकडे लिहून देत हार-जितीचा बेकायदेशीर जुगार खेळवताना रंगेहात आढळला.
३०० रुपयांच्या रोजंदारीवर चालत होता जुगार…
पोलिसांनी आरोपी अब्दुल शब्बीर याच्याकडून मटका आकडे लिहिलेले पट्टी बुक, कार्बनचा तुकडा, पेन आणि खिशातील नगदी २,००० रुपये असा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी पंचांसमक्ष कसून चौकशी केली असता, हा मटका अड्डा त्याचा नसून अशीद खान अजहर उल्ला खान (वय ३७, रा. गुरुनगर, वणी) याच्या मालकीचा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मुख्य आरोपी अशीद खान याच्याकडे आपण दररोज ३०० रुपये रोजंदारीवर काम करत असल्याची कबुली आरोपीने दिली.
याप्रकरणी पोलीस हवालदार अविनाश चिकराम यांच्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायदा आणि सहकलम ४९ बीएनएस (BNS) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मारोती पाटील करत आहेत.

























