सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी… तालुक्यातील गौराळा शिवार परिसरात पोलिसांनी रात्रीच्या सुमारास मोठी कारवाई करत गोवंशाची बेकायदेशीर आणि निर्दयी वाहतूक उघडकीस आणली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून दोन वाहनांसह एकूण ८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुप्त माहितीच्या आधारे सापळा…
गौराळा परिसरामधून काही वाहनांतून गोवंशाची अवैध वाहतूक केली जात असल्याची खात्रीशीर माहिती मारेगाव पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्रीच्या वेळी परिसरात नाकाबंदी करून सापळा रचला. संशयास्पद वाटणाऱ्या अशोक लेलँड दोस्त (क्रमांक MH 34 BZ 8489) आणि महिंद्रा बोलेरो पिकअप (क्रमांक MH 34 AV 1037) या दोन वाहनांना थांबवून त्यांची तपासणी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.
उन्हाच्या तीव्रतेत जनावरांचा छळ…
जवळपास ४३ ते ४५ अंश सेल्सिअस इतक्या कडक उन्हात, वाहनांवर कोणतेही छप्पर किंवा आच्छादन नसताना बैलांना अत्यंत निर्दयीपणे डांबण्यात आले होते. त्यांना आखूड दोऱ्यांनी घट्ट बांधून ठेवले होते. जनावरांसाठी ना खाण्यापिण्याची सोय होती, ना पुरेशी हवा मिळण्याची व्यवस्था होती. या अत्यंत वाईट परिस्थितीमुळे जनावरांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. तसेच, वाहनचालकांकडे या वाहतुकीशी संबंधित किंवा वाहनांची कोणतीही वैध कागदपत्रे नव्हती.
तीन आरोपी जेरबंद…
प्राण्यांवर क्रूर अत्याचार करून त्यांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये विठ्ठल लक्ष्मण वागदरकर (वय ३९, रा. वरोरा), रत्नाकर मारोती वाकुळकर (वय ४२, रा. टाकळी, डोंगरगाव रेल्वे) आणि शनिदेवा शिवशंकर पांडे (वय २५, रा. वरोरा, जिल्हा चंद्रपूर) यांचा समावेश आहे. या तिन्ही आरोपींविरोधात ‘प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६०’ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाखोंचा मुद्देमाल जप्त…
या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी चार बैल आणि दोन मालवाहू गाड्या असा एकूण ८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई ठाणेदार शाम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगांबर किनाके आणि पोलीस शिपाई सागर दिपेवार यांनी केली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

























