सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
मंदर-वागदरा शिवारात ५५ वर्षीय ट्रॅक्टर चालकाचा संशयास्पद मृत्यू, उष्माघाताची शक्यता की घातपात?

वणी शहरालगतच्या मंदर आणि जुना वागदरा दरम्यान असलेल्या शेत शिवारात बुधवारी (२७ मे) सकाळी एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. येथील एका शेतात अंदाजे ५५ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे. शंकर शंडकू आत्राम असे या मृत व्यक्तीचे नाव असून, ते वणी शहरातील खडबडा मोहल्ला (गॅस गोडाऊन जवळ) येथील रहिवासी होते. प्राथमिक माहितीनुसार, ते व्यवसायाने ट्रॅक्टर चालक होते आणि लाकूड वाहतुकीचे काम करायचे.
झाडाच्या सावलीत थांबले अन्…
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (२६ मे) शंकर आत्राम हे सरपण आणि लाकूड गोळा करण्यासाठी मंदर परिसरातील शिवारात गेले होते. सध्या उन्हाचा पारा प्रचंड वाढल्याने, कडक उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी एका झाडाच्या सावलीचा आसरा घेतला. मात्र, वातावरणातील तीव्र उष्णतेचा फटका बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
उष्माघाताचा बळी?
बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास शेताकडे जाणाऱ्या काही स्थानिक नागरिकांना एक व्यक्ती झाडाखाली निपचित पडलेली दिसली. जवळ जाऊन पाहिले असता ते मृत असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, मृतकाच्या नाकातून रक्त येत असल्याने तीव्र उन्हामुळे ‘सनस्ट्रोक’ म्हणजेच उष्माघाताने त्यांचा प्राणांत झाला असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
पोलीस तपास सुरू नागरिकांनी या घटनेची तात्काळ माहिती स्थानिक पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा सविस्तर पंचनामा केल्यानंतर, शवविच्छेदन (Post-Mortem) करण्यासाठी तो वणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृत्यूचे नेमके आणि अचूक कारण वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. वणी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

























