सुनिल तुगनायत,सिटी हब मिडिया वणी…
वणीत सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल…

शहरातील बी.एस.एन.एल. टॉवरच्या पाठीमागे सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढणाऱ्या एका तरुणाला वणी पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याच्याकडून गांजाची सिगारेट व अंमली पदार्थ भरण्याचा पेपर जप्त करण्यात आला असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवराज विजय उपरे (वय २१, रा. जुना कॉटन मार्केट, आशीर्वाद हॉटेल मागे, वणी) असे आरोपीचे नाव आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २५ मे रोजी सायंकाळी ६:२५ वाजताच्या सुमारास वणी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शुभम महानवर हे कर्मचाऱ्यांसह गस्तीवर होते. दरम्यान, बी.एस.एन.एल. टॉवरच्या पाठीमागे सार्वजनिक ठिकाणी आरोपी युवराज उपरे हा गांजा नावाचा अंमली पदार्थ पिऊन झिंगलेल्या अवस्थेत मिळून आला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ गांजा भरलेली सिगारेट, माचिस आणि गांजा भरण्यासाठी वापरण्यात येणारा ‘Tree paper’ लिहीलेला कागद असा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी सदर मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शुभम महानवर (वय ३१) यांच्या लेखी रिपोर्टवरून वणी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध कलम ८ (क), २७ गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (NDPS Act) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेची ई-साक्ष करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस नाईक गजानन सावसाकडे करत आहेत.
वणीमध्ये नशा करणाऱ्या युवकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे हे सगळ्यांसाठी चिंतेची बाब आहे जर याकडे वेळीच लक्ष नाही दिले तर तरुण पिढी येणाऱ्या काळात नशेच्या आहारी जाईल व हे चित्र खूप चिंताजनक असेल, पोलीस वारंवार ड्रग्स तस्कारांवर कारवाई करतात परंतु ती अपुरी वाटत आहे कारण युवकांच्या हाती इतक्या सहजतेने उपलब्ध होणं, हे खूप धोकादायक आहे पोलिसांनी यावर एक निश्चित कारवाई करणे खूप आवश्यक आहे जेणेकरून ड्रग्स तस्करांच्या मुसक्या आवळल्या येतील…

























