सुनिल तुगनायत सिटी हब मिडिया वणी…
कर्तव्य की वैयक्तिक हित? वणी-यवतमाळ रस्त्यावरील ‘त्या’ देवाणघेवाणीची चर्चा…
शासकीय वाहनातून चालणारा तो व्यवहार??? नागरिकांच्या विश्वासाला तडे???
३१ मे रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास वणी-यवतमाळ रस्त्यावरील एका प्रार्थनास्थळाजवळ एका शासकीय विभागाचे वाहन उभे होते. ज्या यंत्रणेवर सर्वसामान्य नागरिकांच्या हिताची आणि सुरक्षेची जबाबदारी असते, त्याच यंत्रणेतील तीन ते चार कर्मचारी त्या वाहनात उपस्थित होते.

त्याच वेळी, एक पादचारी व्यक्ती त्या वाहनाच्या दिशेने चालत आली. त्या व्यक्तीच्या हातात पाचशेच्या नोटांचे एक बंडल होते. वाहनाजवळ पोहोचताच, त्या व्यक्तीमध्ये आणि आतील कर्मचाऱ्यांमध्ये अतिशय परिचयाचा संवाद सुरू झाला.

काही वेळ चर्चा झाल्यानंतर, त्या व्यक्तीने आपल्या हातातील बंडलमधून काही नोटा काढल्या आणि वाहनातील कर्मचाऱ्याकडे सुपूर्द केल्या. कर्मचाऱ्यानेही कोणतीही संकोच न बाळगता त्या नोटा स्वीकारून आपल्या खिशात ठेवल्या.
हा व्यवहार पूर्ण होताच एकमेकांना निरोप देत ते वाहन पुढे निघून गेले. तर दुसरीकडे, ती व्यक्ती एका मोठ्या चिंतेतून मुक्त झाल्यासारखा चेहऱ्यावर भाव आणून तिथून निघून गेली.
प्रार्थनास्थळाच्या परिसरात भरदुपारी घडलेला हा प्रकार अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करतो. ज्या कर्मचाऱ्यांना जनतेच्या सेवेसाठी नियुक्त केले आहे, ते स्वतःच्या आर्थिक हिताला प्राधान्य देत असल्याचे यावरून दिसून येते. अशा प्रकारच्या व्यवहारांमुळे शासकीय यंत्रणेवरील सर्वसामान्यांचा विश्वास कमी होत चालला आहे.


























